Folowers

आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश; ठाण्याच्या पाणीप्रश्नावर शिलार-पोशीरसोबतच इतर जलस्रोतांची चाचपणी, काळू धरण फास्ट ट्रॅक करण्याचे निर्देश

ठाण्याच्या भविष्यातील पाणीप्रश्नासाठी आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. शिलार आणि पोशीर प्रकल्पांमधून ६०० एमएलडी पाण्याच्या मागणीसोबतच इतर जलस्रोतांतून अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते का याची चाचपणी करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. तसेच काळू धरणाचे प्रलंबित न्यायालयीन प्रकरण ‘फास्ट ट्रॅक’ करण्याचे आदेशही देण्यात आले.


ठाणे महानगरपालिकेला शिलार व पोशीरमधून प्रत्येकी ३०० एमएलडी, असे एकूण ६० एमएलडी पाणी मिळावे या मागणीसंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. कोकण पदवीधर आमदार ॲड. निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यानंतर ही बैठक झाली.


बैठकीनंतर आमदार डावखरे म्हणाले, “शिलार-पोशीरसोबतच इतर धरणांमधून अतिरिक्त पाणी मिळू शकते का याची तपासणी करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले. काळू धरणाचे प्रकरणही जलद निकाली काढण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक’ करण्याचे निर्देश दिले आहेत.”


ठाणे महापालिका क्षेत्रातील सध्याची लोकसंख्या सुमारे २९.८१ लाख असून ५९० एमएलडी पाणीपुरवठा होतो. घोडबंदर, कळवा, मुंब्रा, दिवा येथे लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी दीर्घकालीन जलनियोजन आवश्यक असल्याचे डावखरे यांनी बैठकीत मांडले.


“ठाणेकरांना भविष्यात पाणीटंचाई भोगावी लागू नये यासाठी सर्व संभाव्य जलस्रोतांचा विचार होणे गरजेचे आहे. शिलार-पोशीरसह इतर स्रोतांची तपासणी आणि काळू धरणाला गती मिळणे ही सकारात्मक बाब आहे,” असे ते म्हणाले.


ठाण्याच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी शासनस्तरावर सकारात्मक निर्णय होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहील, असा विश्वास आमदार डावखरे यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत