धुवांधार पावसात निघाली तिरंगा यात्रा.
‘हर घर तिरंगा’च्या जयघोषाने ठाणे दुमदुमले
ठाणे : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्यासाठी ठाण्यात मंगळवारी धुवांधार पावसातही भव्य ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात आली. मुसळधार पावसातही नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या घोषणा दिल्याने ठाणे दुमदुमून गेले.
भारतीय जनता पार्टी, ठाणे शहर जिल्हा आणि कोपरी-पाचपाखाडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. समीरा भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आर. जे. ठाकूर कॉलेज, कामगार हॉस्पिटल रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून यात्रेला सुरुवात झाली.
पावसाचा जोर असतानाही तरुण, महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. हातात तिरंगा घेऊन देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला. पावसाच्या सरींमध्ये फडकणाऱ्या तिरंग्यांनी देशभक्तीचे अनोखे चित्र उभे केले.
यावेळी संयोजक नगरसेवक सुरेश कांबळे, सहसंयोजक राजेश गाडे, भाजप पदाधिकारी कृष्णा भुजबळ, सचिन सावंत, भूषण पाटील, शशिकांत दुबे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
‘पाऊस आला तरी देशप्रेमाचा उत्साह कमी झाला नाही’ ही भावना यात्रेतून दिसून आली. ‘हर घर तिरंगा’च्या जयघोषासह राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत ही यात्रा संस्मरणीय ठरली.

Post a Comment