अ.भा. मराठी नाट्य परिषद आयोजित नाट्य प्रवेश स्पर्धा उत्साहात; ‘माय चॉइस’ प्रथम
ठाणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेतर्फे प्रथमच नाट्य प्रवेश अर्थात स्किट स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. गेली दोन दशके द्विपात्री अभिनय स्पर्धा घेणाऱ्या शाखेने यंदा स्वरूप बदलले. ठाणे-मुंबईतील 20 संस्थांनी यात सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे प्राथमिक शाळेतील बालकलाकारांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांनी अभिनय सादर केला. विषयवैविध्य आणि सादरीकरणामुळे प्रेक्षकांची दाद मिळाली.
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक प्रबोध कुलकर्णी आणि लेखिका-अभिनेत्री हर्षदा बोरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि एकूण नाट्य परिणाम यांच्या आधारे परीक्षण झाले.
बक्षीस वितरणावेळी हर्षदा बोरकर म्हणाल्या, "केवळ बक्षिसासाठी न करता रंगभूमीच्या शक्यतांचा शोध घेण्याचा प्रयत्न कलाकारांनी करावा." प्रबोध कुलकर्णी यांनी खेळकर शैलीत निकाल जाहीर केला.
सांघिक पारितोषिके
प्रथम : ‘माय चॉइस’ — मोरया इव्हेंट्स
द्वितीय :* ‘गांधी एक विचार धारा’ — सरस्वती इंग्रजी माध्यम, प्रायमरी
तृतीय : ‘लाइट गेलीय का?’ — इरसाल स्टोरीज
इतर पुरस्कार
लेखन : अभिप्राय पारकर — ‘खांद्यावरचं जग’
दिग्दर्शन प्रथम : प्रफुल्ल गायकवाड, शिशिर कोण्णूर — ‘माय चॉइस’
अभिनय पुरुष प्रथम : शार्दूल शिंदाडकर — ‘डॉक्टर तुम्ही सुद्धा’
अभिनय स्त्री प्रथम : माधवी जोगळेकर — ‘सागरा प्राण तळमळला’
नाट्य परिषदेचे अध्यक्ष खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा यशस्वी झाली. नवोदित आणि अनुभवी कलाकारांना व्यासपीठ मिळाल्याने भविष्यातही अशा स्पर्धा व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त झाली.

Post a Comment