Folowers

१७ ऑगस्ट रोजी ठाण्यात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ समारोप; १ लाखांहून अधिक अमराठी चालकांचे प्रशिक्षण पूर्ण

 


ठाणे: १ मे पासून सुरू झालेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाचा’ समारोप १७ ऑगस्ट रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार असून, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या हजारो अमराठी चालकांना प्रमाणपत्र वितरित केले जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.


राज्यभर राबवलेल्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, आतापर्यंत १ लाखांहून अधिक अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी व्यवहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. उर्वरित चालकांनी १५ ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन सरनाईक यांनी केले.


सनाईक म्हणाले, “महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठीचे जुजबी ज्ञान आवश्यक आहे. ही सक्ती नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी मराठीत बोलणारा प्रत्येक चालक महाराष्ट्राच्या संस्कृतीचा दूत ठरतो.” मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून अस्मितेचा आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रमाणपत्रांबाबत बोलताना ते म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रमाणपत्र हे सहभागाचे प्रमाणपत्र आहे, केवळ ते दाखवून कारवाई टळणार नाही. आरटीओ अधिकारी चालकांशी मराठीत संवाद साधतील आणि उत्तर देता आले तरच नियमांचे पालन झाले असे मानले जाईल. नियम न पाळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होईल.


मराठी प्रवाशांनीही समोरचा चालक हिंदी भाषिक आहे असे गृहीत धरून हिंदीत संवाद साधू नये, मराठीतच बोलावे, असे आवाहन त्यांनी केले. मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने राबवलेल्या या अभियानाने लोकचळवळीचे स्वरूप घेतल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत