Folowers

कळव्यात 8 कोटींची खंडणी मागणाऱ्या 3 जणांना गुन्हे शाखेकडून अटक; 10 लाखांचा पहिला हप्ता घेताना सापळा


ठाणे (प्रतिनिधी): प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे 8 कोटी रुपयांची खंडणी मागून त्यापैकी 10 लाखांचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या 3 आरोपींना ठाणे गुन्हे शाखा, घटक-9 ने सापळा रचून अटक केली आहे.


कळवा येथील सौरभ नंदकुमार साळवी या व्यावसायिकाने कल्याण येथील "केशव हाईट्स" इमारतीचे मुळ मालक मृत झाल्यानंतर केलेल्या नोटरीच्या आधारे तक्रार दाखल केली होती. याचा फायदा घेत संतोष बावडेकर, सिध्देश बेंडकोळी आणि इम्तीयाज मोमीन या तिघांनी साळवी यांना ईडी, सीबीआय, ईओडब्ल्यू व न्यायालयात तक्रारी करून अडचणीत आणण्याची धमकी दिली. 

तक्रार मागे घेण्यासाठी आणि इतर विभागात तक्रार न करण्यासाठी विविध खात्यांना साडेचार कोटी व संपूर्ण प्रकरण लीगल करण्यासाठी 4 कोटी अशी एकूण 8 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली.


गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. अमोल वालझाडे यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे सापळा लावला. 

दि. 30/07/2026* रोजी कळवा, पारसिकनगर येथील केशव हाईट्स, बी बिल्डींग येथील कार्यालयात आरोपी 10 लाखांचा पहिला हप्ता घेण्यासाठी आले असता, रोख रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेले आरोपी:

1.  संतोष मनोहर बावडेकर - वय 47, रा. खारीगाव, कळवा

2.  सिध्देश हरीशचंद्र बेंडकोळी - वय 35, रा. केशव हाईट्स, खारीगाव

3.  इम्तीयाज इलियास मोमीनमी - वय 39, रा. सांगली


सदर प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 443/2026 भा.न्या.सं. 308(2), 308(3), 308(6), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मा. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दि. 01/08/2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोनि. अमोल वालझाडे करत आहेत.


ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत