Folowers

डेटा सेंटरविरोधात ठाणेकरांचा एल्गार


  "वेक अप ठाणेकर" च्या नेतृत्वात हजारो ठाणेकर रस्त्यावर

ठाणे : प्रस्तावित अमेझॉन डेटा सेंटरला विरोध करण्यासाठी "वेक अप ठाणेकर" या संस्थेने दिलेल्या हाकेला हजारो ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शनिवारी सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान बाळकूम येथील प्रस्तावित डेटा सेंटरच्या बाहेर अबालवृद्धांसह हजारो नागरिकांनी एकवटून डेटा सेंटर हद्दपार करण्याचा निर्धार केला.

या आंदोलनात सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते *मनोज प्रधान* म्हणाले, "डेटा सेंटरविरोधातील हा लढा अराजकीय आहे. आमचे पाणी, वीज पळवून आम्हालाच त्रासदायक ठरणारा हा प्रकल्प आम्ही हाणून पाडणार."

आंदोलनाची कारणे काय?

बाळकूम येथील 53 एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार:

1.  पाणी वीज - या डेटा सेंटरसाठी दररोज 12 दशलक्ष लिटर शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे.

2.  ध्वनी प्रदूषण - डेटा सेंटरमधून वर्षाचे 365 दिवस, 24 तास 90 डेसिबल आवाज परिसरात घुमणार आहे. याचा फटका गर्भवती महिला, लहान मुले आणि वृद्धांना बसणार आहे.

3.  आरोग्य व पर्यावरण - डेटा सेंटरमुळे परिसरातील तापमान 3°C ते 5°C ने वाढू शकते. प्रकल्पाच्या 1 किमी परिघात 8 गृहनिर्माण संकुल, 5 शाळा आणि 3 रुग्णालये आहेत. त्यात 400 मीटर अंतरावर एक बाल रुग्णालयही आहे.

4.  सल्लामसलत नाही - स्थानिक रहिवाशांशी कोणतीही चर्चा न करता हा प्रकल्प लादला जात आहे.

पार्श्वभूमी

"वेक अप ठाणेकर" चे दयानंद नेने, साधनाताई प्रधान, राजेश कदम, मेघना शेट्टी, जतीन कोठारे, अनुराधा रोडे आदींनी मागील आठवड्यात जनआंदोलनाची घोषणा केली होती. गुरुवारी या शिष्टमंडळाची अमेझॉन प्रतिनिधींसोबत ठामपा आयुक्तांच्या दालनात बैठक झाली होती. मात्र अमेझॉनकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप करत संस्थेने नागरिकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले.

आजच्या आंदोलनात बाळकूम, कोलशेत, ढोकाळी परिसरातील सोसायट्या आणि गावांतील हजारो नागरिक सहभागी झाले होते. "हा डेटा सेंटर बाळकूम येथे होऊ देणार नाही. गरज पडल्यास यापेक्षा उग्र आंदोलन करू" असा इशारा आंदोलकांनी दिला.

मनोज प्रधान यांचा आरोप

"ठाणेकरांचे पाणी, वीज जबरदस्तीने घेऊन अमेझॉन CSR अंतर्गत ठाण्यात 50 निवारे बांधणार आहे. हे फुकट नाही. यासाठी ठाण्याचे पाणी-वीज दिले जाणार आहे. म्हणजे यात 'देवाण-घेवाण' झाली आहे," असा गंभीर आरोप प्रधान यांनी केला.


या आंदोलनात नर्मदा बचाव आंदोलनातील सामाजिक कार्यकर्ते संजय मंगळे, जगदीश खैरालिया, ऋता आव्हाड आदीही सहभागी झाले होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत