Folowers

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी (श.प.) चे जोरदार आंदोलन

 


ठाणे - सोनम वांगचूक यांचे उपोषण दडपशाहीने मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच संसदेवर मोर्चा काढणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. 


सोनम वांगचूक यांचे उपोषण संपविण्यासाठी केंद्र सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करीत त्यांना जबरदस्तीने रूग्णालयात दाखल केले आहे. वांगचूक यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले आहे. याच ठिकाणी अभिजीत दीपके यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. शिवाय, संसदेवरील मोर्चा काढणाऱ्या तरूणांवर लाठीचार्जही करण्यात आला. हा प्रकार हुकूमशाहीची नांदी असल्याचा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, विरोधी पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 


यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ​ १९७३ साली बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. ते आंदोलन पेटलं आणि त्यामध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला. तुम्ही या देशामध्ये तियानमेन स्क्वेअर करू नका. विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडल्या; लाठीचार्ज केला की काय होते, हे सबंध चीनने पाहिले होते. तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका. भगतसिंग यांचे वय २७ होते, राजगुरुंचे वय २६ होते.  सुखदेव २६ वर्षांचे होते. ते सगळे कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थीच होते. एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली, की ते तो कोणीही थांबवू शकत नाही. आज देशभरातील विद्यार्थी एकत्र आले असून, त्यांच्या या चळवळीला कोणाचेही राजकीय पाठबळ नाही, तर ते स्वतःहून एकत्र आले आहेत. आपल्या जीवनाशी खेळणाऱ्यांना सहन का करायचे, असा सवाल विद्यार्थी करीत आहेत. हा आगडोंब उसळला आहे. आता देश वाचविण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, मनोज प्रधान म्हणाले की, आजचं जे आंदोलन आहे, ते खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आहे. गेल्या २२ दिवसांमध्ये एक फरक पडला आहे की विद्यार्थी आणि लोकं स्वतःहून रस्त्यावर उतरायला लागले आहेत. आज आंदोलन सर्वपक्षीय नेत्यांचे होतं, पण आज इतके विद्यार्थी इथे स्वतःहून आलेले आहेत ते बघून खरंच बरं वाटलं. म्हणजे आता लोकांना कळायला लागलंय की १२ वर्षे जे ते झेलतायत, त्याच्या विरोधात आता ते चुप बसणार नाहीत, ते रस्त्यावर उतरायची त्यांनी तयारी केलेली आहे आणि त्याचं तेच प्रतीक आज इकडे बघायला मिळतंय."


या आंदोलनात नगरसेवक यासीन कुरेशी,  महिलाध्यक्ष , नगरसेविका मनिषाताई भगत, युवक अध्यक्ष तथा नगरसेवक अभिजित पवार ,नगरसेविका पल्लवी जगताप,  मुंब्रा - कळवा विधानसभाक्षेत्राध्यक्ष शमीम खान , युवक कार्याध्यक्ष राजेश कदम,  सरचिटणीस राजेश साटम, फुलबानो पटेल, मिलींद बनकर, महेश भाग्यवान, समीर पाटील, एकनाथ जाधव, अविनाश अंधारे, साहिल उदगुडे, अंकुश मढवी, मनिषा पाटील, शशिकला पुजारी, माधुरी सोनार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत