मोटार वाहन कर्मचारी बेमुदत संपावर ,प्रादेशिक परिवहन कार्यालयात शुकशुकाट
ठाणे शहर,(बातमीदार) दीर्घकाळापासूम प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मोटार वाहन विभागातील (आरटीओ) कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत संपाचे पाऊल उचलले. ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले. पहिल्याच दिवशी या संपाचा नागरिकांच्या कामकाजावर परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. ऑनलाइन कामावर देखील संपाचा काहीसा परिणाम झाला. वाहने हस्तांतरित करणे नोंदणी करणे ही कामे मोठ्या प्रमाणात खोळंबल्याचे दृश्य ठाणे मुख्य कार्यालयात पाहायला मिळाले.
सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा; केंद्र शासन व 25 घटक राज्यांप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करावे, या तसेच अन्य मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी 21 एप्रिल पासून बेमुदत संप आंदोलन पुकारले होते, त्यानंतर ते काही काळ स्थगित झाल्यानंतर पुन्हा मोटार वाहन कर्मचाऱ्यांनी संपाचे शस्त्र हाती घेतले आहे. ठाण्यातील प्रादेशिक परिवहन विभागातील सर्व कर्मचारी मंगळवारपासून (ता.16) बेमुदत संपावर गेले. या संपामुळे ठाणे मध्यवर्ती कारागृहा जवळील प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग नजीक असलेल्या मुख्य प्रादेशिक परिवहन कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला. तसेच कासारवडवली येथील वाहन चालक परीक्षा केंद्रावर सुद्धा या संपाचा परिणाम झाला. सर्व प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे घेणार नाही असे संपकऱ्यांकडून सांगण्यात आले.
विविध मागाण्यांसाठी मोटार वाहन कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने आटीओच्या काही कामांवर परिणाम झाला असला तरी सर्व कार्यालय सुरु ठेवण्यात आले होते. नागरिकांच्या कामांचा खोळंबा होणार नाही याची काळजी घेण्यात आली होती. शिवाय आता अनेक कामे ऑनलाईन होत असल्याने विभागाच्या कामांवर विशेष परिणाम दिसून आला नाही.
रोहीत काटकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे
प्रादेशिक परिवहन विभागाच्या ठाणे कार्यालयात कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला आहे.

Post a Comment