Folowers

तंबाखू सेवनाचे धोके माहित असूनही 10 पैकी 9 जणांकडून होतेय दुर्लक्ष , रुग्णालयाच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

 


 ठाणे: तंबाखूचे सेवन करणाऱ्या 10 पैकी 9 जणांना त्याचे दुष्परिणामाची माहिती असूनही त्यांच्याकडून तंबाखू सेवनाची सवय सोडली जात नसल्याचे वास्तव किम्स रुग्णालयाने तपासणी केलेल्या अहवालात दिसून आले आहे. जागतिक तंबाखूमुक्त दिनानिमित्त, मार्च ते मे ठाण्यात ही तपासणी करण्यात आली. हे प्रमाण कमी करायचे असेल तर या रोगाचे लवकर निदान होणे हाच त्यावरील सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे रुग्णालयाने म्हटले आहे.


किम्स रुग्णालय जोखमीच्या आणि अवयव पुनःरोपनाच्या शस्त्रक्रियेसाठी प्रसिद्ध आहे. नुकत्याच पार पडलेल्या जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने रुग्णालय प्रशासनाकडून तंबाखूचे सेवन करणाऱ्या ठाण्यातील नागरिकांची तपासणी करण्यात आली. मार्च ते मे या कालावधीत ठाणे आणि परिसरातील विविध ठिकाणी तंबाखू सेवन आणि तोंडाच्या कर्करोग तपासणीसंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली. शासकीय, प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर तोंडाच्या कर्करोगाबाबत वेळोवेळी जनजागृती होत असतानाही तंबाखू पदार्थाचे सेवन करणाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दुर्दैवाची बाब ही कि या पदार्थाचे सेवन केल्याने कर्करोग होतो याची माहिती असतानाही सेवन करणाऱ्यांकडून तंबाखूचे सेवन केले जात आहे. रुग्णालयाचे डॉ. हितेश सिंघवी, डॉ. अनिल हिरूर यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात सर्वेक्षण करण्यात आले.


सर्वेक्षणाचे ठिकाण : मंदिर - मशीद परिसर, रेल्वे स्थानके, बँक कर्मचारी, ऑटो-रिक्षा चालक, घरकाम करणाऱ्या महिलांसह विविध सामाजिक घटकांची ठिकाणे.


456 नागरिकांची तपासणी करण्यात आली.


सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 77.2 टक्के लोकांना तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो याची त्यांना माहिती होती. 


तंबाखू सेवन करणाऱ्या 162 व्यक्तींमधील 142 जणांना धोके माहित असूनही तंबाखूचे सेवन करत असल्याचे आढळून आले.


विडी, सिगारेट पेक्षा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे अधिक प्रमाणात आढळले.


तंबाखू आणि सुपारीचे सेवन करणाऱ्या 28 टक्के जणांना तोंड उघडण्याची समस्या जाणवली.


गेल्या एका वर्षात केवळ 23.5 टक्के जणांचा तंबाखू सोडण्याचा प्रयत्न दिसून आला.


7.9 टक्के जणांच्या तोंडात दीर्घकाळ बऱ्या न होणाऱ्या जखमा आढळल्या. 


चारपैकी एका जण सेकंड-हँड स्मोकच्या संपर्कात असल्याचे दिसले.


व्हेपिंग हे धूम्रपानापेक्षा सुरक्षित आहे असा गैरसमज वाढत आहे. काही व्हेप उपकरणांमधील निकोटीनचे प्रमाण शेकडो सिगारेट्सच्या समतुल्य असू शकते, ज्यामुळे विशेषतः तरुणांमध्ये व्यसनाधीनता आणि दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.

सौरभ गुप्ता, प्रादेशिक संचालक, किम्स रुग्णालय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत