थकीत देणी मिळावीत म्हणून एसटी कामगारांचा ठाण्यात घंटा नाद
ठाणे: एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध थकीत देणी त्वरित अदा कराव्यात या मागण्यांसाठी सर्व संघटनांनी ठाणे जिल्ह्यातील आठ विभागांमध्ये घंटा नाद करून आपला रोष व्यक्त केला. कोट्यावांधिची थकीत देणी अदा केली नाही तर काही दिवसांनी काम बंद आंदोलन पुकारून एसटीचा चक्का जाम केला जाईल असा इशारा संघटनांनी दिला. सोमवारी झालेल्या घंटा नाद आंदोलनात शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 2016 पासून कर्मचाऱ्यांची विविध थकीत देणी दिलेल्या नाहीत. वारंवार बैठका घेऊन देणी देण्याची घोषणा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. असा आरोप करत महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना, शिव परिवहन वाहतूक व कामगार सेना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, बहुजन राज्य परिवहन कर्मचारी संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस, महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस, राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस, मागासवरर्गीय अधिकारी व पर्यवेक्षक वेलफेअर असोसियशन, बहुजन राज्य परिवहन अधिकारी/ कर्मचारी संघटना आणि एसटी वर्कर्स काँग्रेस संघटनांचे पदाधिकारी अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. सोमवारी(ता.15) ठाण्यातील खोपट आगार 1 आणि 2 मध्ये दुपारी मंदिरात आरती करून घंटा नाद करण्यात आला.

Post a Comment