वेक अप ठाणेकर....! सुनियोजित ठाण्यासाठी प्रतिष्ठित ठाणेकर सरसावले
ठाणे - ठाणे शहराला विकासाच्या नावावर भकास करण्याचे धोरण आखले जात आहे. अमर्याद वृक्षतोड केली जात आहे. नवनवे प्रकल्प आणताना ठाणेकरांना विश्वासात घेतले जात नाही. परिणामी, ऐतिहासिक शहर म्हणून ज्या ठाण्याचा जगभर डंका आहे. त्या शहराची वाताहत होताना पाहणे अवघड असल्याने आपण ठाणे शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून व्यवस्थेला प्रश्न विचारण्यासाठी "वेक अप ठाणेकर " हे अभियान राबवीत आहोत, असे दयानंद नेणे, राजेश कदम, मेघना शेट्टी, अविनाश चिटणीस, हिमानी वर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बुधवारी ठाणे शहराच्या विविध भागात "वेक अप ठाणेकर" अर्थात ठाणेकर जागा हो, असा संदेश देणारे होर्डिग्ज लावण्यात आले होते. या होर्डिग्जची जोरदार चर्चा ठाण्यात होती. हे होर्डिग्ज कोणी लावले , याची चर्चा सुरू असतानाच आज दक्ष ठाणेकरांनी एकत्र येऊन आपली ओळख दिली.
दयानंद नेने यांनी सांगितले की, ठाणे शहरात विकासाच्या नावाखाली गेल्या काही महिन्यांत सुमारे दहा हजार झाडांची कत्तल केली आहे. त्याबदल्यात किती झाडे लावण्यात आली? किती जगवली? याची काहीही माहिती दिली जात नाही. रिंग रेल्वेच्या नावाखाली शहर पोखरून टाकण्यात येत आहे. खरोखर शहराला याची गरज असणार आहे का? अमेझाॅन आणून ठाणेकरांच्या तोंडचे पाणी पळविले जात आहे. मेट्रोच्या नावाखाली हाय -वे अरुंद केले जात असून सर्वीस रोड संपवून टाकले जात आहेत. या सर्व प्रकल्पात ठाणेकरांची मतेही जाणून घेतली जात नाहीत. ठाणेकरांना विचारात घेऊनच हे प्रकल्प राबवावेत, अशी आमची माफक अपेक्षा आहे. त्यासाठीच आम्ही दबावगट निर्माण करणार आहोत.
हा दबावगट पूर्णतः अराजकीय असला तरी आमच्यासाठी कुणीही वर्ज्य नाही. शहराच्या धोरणात्मक विकास कामात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांनाच आम्ही सामावून घेणार आहोत. कारण, कर भरणाऱ्या ठाणेकरांना न्याय मिळाला पाहिजे, अशी आमची धारणा आहे, असे राजेश कदम यांनी सांगितले.
दरम्यान, अवाजवी खर्चाचे प्रकल्प राबविण्यापूर्वी ठाणे महानगर पालिकेने जनमत जाणून घेण्यासाठी जनसुनावण्या घ्याव्यात; परिसंवादातून आम्हा ठाणेकरांशी संवाद साधावा अशी विनंती आम्ही आयुक्त सौरव राव यांना करणार असून चुकीच्या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी आम्ही सर्व प्रकारचे संविधानिक मार्गांचा अवलंब करणार आहेत, असे मेघना शेट्टी आणि हिमानी वर्मा यांनी सांगितले.
यावेळी या फोरममधील गुरूसीस सिंह, श्रीकांत बर्वे, हिनल जयवंत, लावण्या पाटील, अनिल शाळिग्राम, साहिल उदगुडे आदी उपस्थित होते.

Post a Comment