Folowers

"उंच टॉवर उभे राहतात, पण पाणी कुठून आणणार?" - आमदार डावखरेंचा विधान परिषदेत पाणी प्रश्नावर सरकारला सवाल


बारवी धरणावरील ताण, बोअरवेलवर अवलंबून गृहप्रकल्प; जलसुरक्षा श्वेतपत्रिकेची मागणी, सरकारकडून संयुक्त बैठकीचे आश्वासन


मुंबई, 22 जून 2026: ठाणे जिल्ह्यातील भीषण पाणीटंचाई आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी आज विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे सरकारचे लक्ष वेधले.


आमदार डावखरेंचे प्रमुख मुद्दे:

- बारवी धरण ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरसाठी जीवनवाहिनी असून वाढती लोकसंख्या व अपुऱ्या पावसामुळे नागरिकांना दरवर्षी पाणीकपातीला सामोरे जावे लागते.

- ठाणे मनपाची लोकसंख्या 15 लाखांवरून 22 लाखांपेक्षा जास्त झाली. मात्र अनेक मोठे गृहप्रकल्प अधिकृत पाणी जोडणीविना फक्त बोअरवेलवर अवलंबून आहेत.

- "उंच टॉवर उभे राहतात, पण पाणी कुठून आणणार?" असा सवाल करत पाणी उपलब्धता तपासल्याशिवाय नव्या बांधकामांना परवानगी देऊ नये, अशी मागणी केली.

- प्रत्येक प्रकल्पासाठी 'Water Availability Report' अनिवार्य करावा.

- बारवी धरणाची क्षमता वाढवावी, नवीन जलस्रोत विकसित करावेत व नागपूर अधिवेशनापूर्वी 'जलसुरक्षा श्वेतपत्रिका' जाहीर करावी.

- नगरविकास, जलसंपदा, MIDC व स्थानिक स्वराज्य संस्थांची संयुक्त बैठक बोलवावी.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे उत्तर:

- यंदा 'अल् निनो'मुळे पाऊस लांबला आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन औद्योगिक वापरात कपात करून फेरनियोजन केले जात आहे.

- पाणीपुरवठा, नगरविकास व जलसंपदा विभागाची संयुक्त बैठक घेऊन कृती आराखडा तयार केला जाईल.

- बारवी धरणाची क्षमता वाढवण्याबाबत जलसंपदा विभागामार्फत तपासणी होईल.

- मुंबई-ठाणे महानगर प्रदेशासाठी 'शिलार' व 'पोशीर' ही दोन नवीन धरणे प्रस्तावित आहेत.

- 'जल जीवन मिशन' अंतर्गत दररोज 135 लिटर पाणी देण्याच्या उद्दिष्टाने दीर्घकालीन उपाययोजना सुरू आहेत.

आमदार डावखरे यांनी हा प्रश्न पुढील दशकांच्या नियोजनाशी संबंधित असल्याचे सांगत शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत