पायाभूत सुविधा पूर्ण झाल्याशिवाय जमीनमालकास टीडीआर देऊ नका – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
ठाणे : ठाणे शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण पडू नये, यासाठी ठाम भूमिका घेत परिवहन मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. टिकुजीनी वाडी परिसरातील मोजे चितळसर-मानपाडा येथील आरक्षित खाजगी जागेची पाहणी केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, या जागेवर भविष्यात कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही याची हमी देण्यात यावी.
या जागेवर ठाणे महापालिकेने उद्यानाचे आरक्षण टाकले असून ती जागा शहरासाठी हरित क्षेत्र म्हणूनच कायम राखण्यात यावी, अशी भूमिका मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केली.
नागरिकांना शुद्ध हवा, पर्यावरणपूरक परिसर आणि खुली जागा उपलब्ध व्हावी यासाठी हा परिसर संरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की, आरक्षित जागेच्या मोबदल्यात संबंधित जमीनमालकास सुमारे ८० लाख चौरस फूटा पेक्षा जास्त टीडीआर देण्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात टीडीआर मंजूर झाल्यास शहरावर अतिरिक्त लोकसंख्या आणि विकासाचा ताण पडू शकतो. तसेच UDCPR च्या नव्या निर्देशानुसार विकासकांना अतिरिक्त FSI मिळतो. सध्या राहत असलेल्या नागरिकांना पायाभूत सुविधा व्यवस्थित तरी मिळाले पाहिजेत! तसेच भविष्यात होणाऱ्या नागरिकांनाचा विचार करून पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या सर्व मूलभूत पायाभूत सुविधांची क्षमता वाढवून त्या पूर्णपणे सक्षम केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत टीडीआर मंजूर करू नये.
गेली २० वर्षांपेक्षा जास्त काळ मी या विभागाचा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे या नागरिकांनी माझ्याकडे ज्या विविध तक्रारी केलेल्या आहेत, त्यानुसार मी हा पाहणी दौरा आयोजित केला होता.
यासंदर्भात ठाणे महापालिकेने शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून दिल्यानंतरच संबंधित खाजगी जमीनमालकास टीडीआर देण्यात येईल, अशी स्पष्ट भूमिका घ्यावी ,असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले.
ठाणे शहराचा विकास हा केवळ बांधकामांचा नसून नागरिकांच्या जीवनमानाचा विकास असला पाहिजे. पर्यावरणाचे संरक्षण आणि नागरिकांच्या सुविधांचा समतोल राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे शहराच्या हिताला बाधा पोहोचेल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
या निर्णयामुळे भविष्यातील अनियंत्रित बांधकामांना आळा बसण्यास मदत होणार असून ठाणेकरांसाठी मोठे हरित क्षेत्र जपले जाणार आहे. पर्यावरण संवर्धन, नागरिकांच्या हिताचे संरक्षण आणि शाश्वत विकास या तिन्ही बाबींचा समन्वय साधणारी ही भूमिका ठाणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.

Post a Comment