flowers

बॉईज क्रिकेट क्लबला विजेतेपद

 


ठाणे : उत्कंठतापूर्ण लढतीत डोंबिवलीच्या बॉईज क्रिकेट क्लबने एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब २०२६ संघावर १० धावांनी सरशी मिळवत महाराष्ट्र माझा सेवा संस्थेने युनियन क्रिकेट क्लबच्या सहकार्याने आयोजित १४ ठाणे प्रीमियर लीग उपमुख्यमंत्री चषक टी -२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना १७९ धावांचे आव्हान उभे केल्यावर एकनाथ शिंदे क्रिकेट क्लबला निर्धारित षटकांमध्ये १६९ धावांवर रोखत बॉईज क्रिकेट क्लबने पहिल्यांदाच स्पर्धेच्या विजेतेपदावर आपली मोहर उमटविली. स्पर्धेत एका शतकासह सव्वा दोनशेहून अधिक धावा करणाऱ्या बॉईज क्रिकेट क्लबच्या अनिश चौधरीला सामन्यासह स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले.

प्रथम फलंदाजी करताना सृजन आठवले, जय जैन आणि दशरथ चव्हाणने छोट्या पण उपयुक्त खेळी करत संघांच्या धावसंख्येला आकार दिला. सृजनने ४६, जयने ४१ आणि दशरथने ३९ धावांचे योगदान दिले. मोहित अवस्थीने चार, शशिकांत कदमने तिन बळी मिळवले.

उत्तरादाखल डावाची डळमळीत सुरुवात झाल्यानंतर साईराज पाटील, सागर मिश्रा आणि सिद्धार्थ म्हात्रेने किल्ला लढवत सामन्यातील रंगत कायम राखली. साईराजने ३७, सागरने ४५, सिद्धार्थने नाबाद ३९ धावा बनवल्या. साहिल फेगडे आणि यश सिंगने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

ठाण्याच्या महापौर शर्मिला पिपोळलकर, स्पोर्टिंग क्लब कमिटीचे अध्यक्ष आणि ठाणे परिवहन मंडळाचे अध्यक्ष विलास जोशी, स्पर्धेचे प्रमुख संयोजक, नगरसेवक, मुंबई क्रिकेट संघटनेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विकास रेपाळे, नगरसेविका नम्रता भोसले आणि इतर मान्यवरांच्या हस्ते खेळाडूंना पारितोषिके देऊन गौरण्यात आले.

संक्षिप्त धावफलक : बॉईज क्रिकेट क्लब : २० षटकात ९ बाद१७९( सृजन आठवले ४६, जय जैन ४१, दशरथ चव्हाण ३९, मोहित अवस्थी ४-३०-४, शशिकांत कदम ४-२९-३, विवेक शेलार ४-३४-१) विजयी विरुद्ध एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब २०२६ : २० षटकात ९ बाद १६९ ( साईराज पाटील ३७, सागर मिश्रा ४५, सिद्धार्थ म्हात्रे नाबाद ३९, साहिल फेगडे ४-३०-२, यश सिंग ३-२९-२, सक्षम झा ४-३६-१, दशरथ चव्हाण ३-२४-१, सौरभ सिंग ३-३०-१).

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू -

सर्वोत्तम फलंदाज - अनिश चौधरी (बॉईज क्रिकेट क्लब).

 सर्वोत्तम गोलंदाज - शशिकांत कदम ( एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब २०२६). 

सर्वोत्तम क्षेत्ररक्षक - विद्याधर कामत (एकनाथ शिंदे क्रिकेट क्लब).

सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू- दशरथ चव्हाण (बॉईज क्रिकेट क्लब).

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू - अनिश चौधरी ( बॉईज क्रिकेट क्लब).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत