flowers

‘सायकलिंगमुळे आरोग्य आणि शिक्षणाला नवी दिशा’‘ सायक्लोएज्यु उपक्रमाचे सहपोलीस आयुक्तांकडून कौतुक

 


ठाणे : शहरी भागातील वाढती वाहतूक कोंडी, व्यस्त जीवनशैली आणि व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष यावर सायकलिंग हा प्रभावी पर्याय ठरू शकतो. विशेषतः दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सायकल हे अत्यंत उपयुक्त साधन असल्याचे मत ठाणे शहराचे सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केले.


आम्ही Cycle प्रेमी फाऊंडेशनच्या ‘सायक्लोएज्यु’ या उपक्रमाचे कौतुक करताना ठाणे शहराचे सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सायकलिंगचे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित केले.

ते म्हणाले की, शहरांमध्ये वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात नागरिकांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत सायकलचा वापर हा आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि दैनंदिन छोटी-मोठी कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. ग्रामीण आणि दुर्गम भागात सायकलचे महत्त्व अधिक असल्याचे सांगताना त्यांनी आदिवासी पाडे, खेडी आणि दुर्गम वस्त्यांचा उल्लेख केला. “ज्या ठिकाणी इतर वाहने सहज पोहोचू शकत नाहीत, अशा भागांमध्ये विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सायकल अत्यंत उपयुक्त साधन ठरते. त्यातून दैनंदिन जीवन अधिक सुलभ आणि सुखकर होण्यास मदत होते,” असे ते म्हणाले. आम्ही Cycle प्रेमी फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येणारा ‘सायक्लोएज्यु’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगत त्यांनी या उपक्रमामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. या उपक्रमासाठी त्यांनी आम्ही Cycle प्रेमी फाऊंडेशनला शुभेच्छा देत, समाजातील अधिकाधिक लोकांनी अशा सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांना सहकार्य करावे, असे आवाहन केले. दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनतर्फे ‘प्रोजेक्ट सायक्लोएज्यु’च्या चौथ्या पर्वाच्या पोस्टरचे अनावरण डॉ. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, दुर्गा गोरे, अनिकेत गद्रे, काशिनाथ गायकवाड, अमोल कुळकर्णी, सागर महाडीक हे सदस्य उपस्थित होते. यंदाचा उपक्रम शहापूर तालुक्यातील गुंडे गावातील चैतन्य विद्यालय येथे राबविण्यात येणार आहे.

ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था, वाडा (जि. पालघर) संचलित चैतन्य विद्यालय हे दुर्गम आदिवासी भागात कार्यरत असून, येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. सायकल प्रेमी फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांच्या प्रवासातील गंभीर समस्या समोर आल्या आहेत.

या प्रकल्पांतर्गत मुरबाड तालुक्यातील वेलूक, खेड तसेच शहापूर तालुक्यातील वालशेड, भितरवाडी आणि कोठ्याची वाडी या दुर्गम भागांतील शाळेत येणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना सायकली देण्यात येणार आहेत. तसेच इयत्ता पाचवी ते दहावीतील ३५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत