नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे काम रेल्वे प्रशासन तात्काळ सुरु करणार


 केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून दिली माहिती

 रेल्वे स्थानाकाच्या कामाला गती येणार - खासदार नरेश म्हस्के


ठाणे - ठाणे आणि मुलुंड दरम्यान सुरु असलेल्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या रखडलेल्या कामाला आता सुरुवात होणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दुरध्वनी करुन रेल्वेच्या अखत्यारित येणारी सर्व कामे त्वरित सुरु करुन खर्चाचा भार रेल्वे उचलणार असल्याचे सांगितले. यामुळे नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामाला गती येणार असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.


ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या कामास विलंब होत असल्याने लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्याने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. प्रत्यक्ष भेटून निवेदनही दिले होते. खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत सातत्याने याबाबत आवाज उठवला होता.  


आताच्या हिवाळी अधिवेशनात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत रखडलेले रेल्वे स्थानकाचे काम त्वरित सुरु करण्याची विनंती केली होती. तर रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे अधिकाऱ्यांमधील समन्वयाच्या आभावामुळे काम रखडल्याची खंत खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेतील भाषणात व्यक्त करत प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती केली होती. रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीतही खासदार नरेश म्हस्के यांनी हा मुद्दा लावून धरला होता. 


‘स्मार्ट सिटी मिशन' अंतर्गत ठाणे आणि मुलुंड दरम्यान ‘नवीन उपनगरीय रेल्वे स्थानक' मंजूर करण्यात येऊन ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडने त्यांच्या ६० टक्के भागाचे काम पूर्ण केले आहे. मूळ अंदाजे १२० कोटींचा हा प्रकल्प आता २४५ कोटींपेक्षा जास्त झाला आहे. स्मार्ट सिटी मिशन मार्च २०२५ मध्ये संपत आहे, त्यामुळे त्यांच्याकडे आता अतिरिक्त निधी उरलेला नाही. जर मध्य रेल्वेने त्वरित काम सुरु केले नाही तर निधीअभावी प्रकल्प रखडण्याची भीती खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केली होती. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आता मध्य रेल्वे तात्काळ काम सुरु करणार असल्याचे आणि त्या कामाचा खर्च उचलणार असल्याचे सांगितल्याने लवकरच काम प्रगतिपथावर येईल, असा आशावाद खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. तसेच प्रश्न मार्गी लावल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत