आचारसंहिता काळात अनधिकृत बांधकामे आढळल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी- आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
नागरिकांनी देखील याबाबत सतर्क राहून महापालिकेस सहकार्य करावे
ठाणे : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू असताना कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत बांधकामांना थारा देऊ नये, असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. आचारसंहिता काळात नवीन बांधकाम, वाढीव बांधकाम तसेच परवानगीविना सुरू असलेल्या कामांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या बैठकीत सर्व प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. तसेच शहरात कुठेही नव्याने अनधिकृत बांधकाम होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी याबाबत महापालिकेस कळविल्यास त्यावर महापालिकेमार्फत तात्काळ कारवाई करण्यात येईल असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले.
ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे आज आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (2) प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, मनीष जोशी, सचिन सांगळे यांच्यासह नऊ प्रभागसमितीचे सर्व सहाय्यक आयुक्त् उपस्थित होते.
आचारसंहितेच्या काळात शहरात महापालिकेची संपूर्ण यंत्रणा ही निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यचा फायदार घेवून शहरात अनधिकृतपणे नवीन बांधकामे होण्याची शक्यता असते. यासाठी सर्व सहायक आयुक्त यांनी आपापल्या प्रभागसमिती कार्यक्षेत्रात नवीन होणाऱ्या बांधकामांकडे लक्ष ठेवावे. सर्व सहायक आयुक्त् यांचेवर जरी निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली असली तरी त्यांनी प्रभागात नियमित तपासणी मोहिमेच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामे होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. आचारसंहिता काळात नियमांचे उल्लंघन करुन अनधिकृतपणे नवीन बांधकामे शहरात सुरू झाली तर त्यावर निष्कसनाची कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
तसेच, अनधिकृत करणाऱ्या व्यक्तीवर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आचारसंहिता काळात कोणालाही सूट देण्यात येणार नसल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम सुरू असल्यास महापालिकेकडे तात्काळ तक्रार नोंदवावी, या तक्रारीची दखल घेवून महापालिकेच्या माध्यमातून तात्काळ कारवाई करण्यात येईल असेही आयुक्त सौरभ राव यांनी या बैठकीत नमूद करीत ठाणेकरांनी सजग राहून नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामांची माहिती कळवून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Post a Comment