पाणी खात्यातील अभियंत्यांच्या वेतनातील तफावत दूर होणार- आमदार संजय केळकर यांची मध्यस्थी
ठाणे महापालिकेच्या पाणी खात्यात वेतन पद्धतीत विषमता असून येथील ठोक पगारावर असलेल्या अभियंत्यांना कनिष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा कमी पगार दिला जात असून आमदार संजय केळकर यांच्या मध्यस्थीमुळे ही तफावत दूर होणार आहे.
भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील ठोक पगारावरील अभियंत्यांनी उपस्थित राहून वेतनातील तफावतीबाबत तक्रार केली. याबाबत बोलताना श्री. केळकर म्हणाले, ठोक पगारावर असलेल्या अभियंत्यांना २० हजार रुपये वेतन दिले जाते, मात्र कनिष्ठ कर्मचाऱ्यांना त्यापेक्षा जास्त वेतन दिले जाते. कंत्राटदारांच्या गडबडीमुळे हा अन्याय होत असल्याचे श्री.केळकर म्हणाले. अभियंत्यांना त्यांच्या श्रेणीप्रमाणे पगार मिळावा यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून ही तफावत दूर होईल, असेही श्री. केळकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी जनसंवाद कार्यक्रमाला जेष्ठ माजी नगरसेवक मिलिंद पाटणकर, माजी उपमाहापौर अशोक भोईर, महेश कदम, दत्ता घाडगे उपस्थित होते.
सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी देखील बैठक घेऊन अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. महिन्याभरात या कर्मचाऱ्यांची वारसा हक्काची सर्व प्रकरणे निकाली काढून कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती श्री. केळकर यांनी दिली.
जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात ठाणे शहरातील विविध समस्यांबाबत निवेदने प्राप्त होत असतात, तसेच ठाणे शहराबाहेरील जिल्ह्यातील आणि कोकणातूनही अनेक नागरिक समस्या घेऊन येत असतात. आजच्या कार्यक्रमात रत्नागिरीतील मालगुंड येथील आंबा उत्पादक शेतकरीही उपस्थित झाले होते. त्यांनी लावलेल्या आंब्याच्या २०० कलमांची बाग ट्रान्सफॉर्मरमुळे सलग तिसऱ्यांदा उद्ध्वस्त झाल्याची त्यांनी तक्रार केली. श्री.केळकर यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्याशी फोनवरून चर्चा करून बागेतील ट्रान्सफॉर्मर हलविण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. लवकरच हा ट्रान्सफॉर्मर हलविण्यात येऊन आंबा उत्पादकाला दिलासा मिळेल असे श्री.केळकर यांनी सांगितले.

Post a Comment