ठाणे महापालिकेच्या तीन फिरत्या दवाखान्यांचे खासदार नरेश म्हस्के यांनी केले लोकार्पण

      ठाणे  : ठाणे महानगरपालिकेचा  तीन फिरत्या दवाखान्यांचे शुक्रवारी खासदार नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. 


        महापालिका मुख्यालयाच्या प्रागंणात झालेल्या या कार्यक्रमास उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. वर्षा ससाणे आदी उपस्थित होते. सार्वजनिक आरोग्य विभाग व पिरामल स्वास्थ तसेच लॅण्डमार्क केअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी हे फिरते दवाखाने सुरू करण्यात आले आहेत.

 

        महापालिकेच्या क्षेत्रात नागरिकांच्या सोयीसाठी, विशेषत: झोपडपट्टी भागात दर्जेदार विनामूल्य आरोग्य सेवा देण्यासाठी ही तीन मोबाईल युनिट्स म्हणजेच फिरते दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. या प्रत्येक युनीटमध्ये एक डॉक्टर, एक नर्स, एक औषधनिर्माण अधिकारी, आरोग्य शिक्षक आणि वाहन चालक असे पथक समाविष्ट आहे.


        हे फिरते दवाखाने स. ९.३० ते दु. ४.३० या वेळेत महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या विभागात कार्यरत असतील. या दवाखान्यात, जवळची दृष्टी सुधारण्यासाठी वाचन चष्मा पुरवण्यात येईल. तसेच, डॉक्टरांमार्फत रुग्णांची आवश्यकतेनुसार हिमोग्लोबीन चाचणी, रक्त शर्करा चाचणी करण्यात येईल. उच्च रक्तदाब, मधुमेह, सर्दी, खोकला, ताप, डायरिया आदी आजारांचे जलद निदान करून औषधोपचार विनामूल्य करण्यात येईल. असंसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध, व्यवस्थापन आणि निरोगी जीवन शैली बद्दल सामुदायिक जागृती या फिरत्या दवाखान्यांमार्फत केली जाणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत