दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरिडॉर सुरू झाल्यावर घोडबंदर रोडवरील अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होईल'


खासदार नरेश म्हस्के यांचे प्रतिपादन
ठाणे महानगरपालिकेतील बैठकीत घोडबंदर              रोडवरील समस्यांचा घेतला आढावा

        ठाणे  : घोडबंदर रोड हा सर्व राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. मार्च २०२६मध्ये दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरिडॉर हा मार्ग सुरू झाल्यावर जवाहरलाल नेहरू बंदरातून होणारी बहुतांश कंटेनर वाहतूक या मार्गावर जाईल. त्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील अवजड वाहनांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होईल, असे प्रतिपादन खासदार नरेश म्हस्के यांनी केले आहे.


        घोडबंदर रोड आणि परिसरातील विविध समस्या आणि प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी खासदार नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका मुख्यालय येथील कै. अरविंद पेंडसे सभागृह येथे झालेल्या या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांच्यासह ठाणे महापालिका, मेट्रो, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, प्रादेशिक परिवहन विभाग यांचे अधिकारी, जस्टिस फॉर घोडबंदर रोड या संस्थेचे प्रतिनिधी, घोडबंदर रोड परिससरातील गृहसंकुलांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. 

          

         घोडबंदर रोड परिसरातील समस्यांवर सर्व यंत्रणांच्या समन्वयाने तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख समस्या रस्त्यांची असून खड्डे, पॅचवर्कचे उंचवटे यामुळे अपघात होत आहेत. उड्डाणपुलावरील रस्त्याची स्थिती चांगली नाही.  त्यावर तत्काळ उपाय करण्याचे निर्देश खासदार म्हस्के यांनी या बैठकीत दिले. एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागांनी ही दुरुस्तीची कामे तातडीने करावीत. ती १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले.


          दिल्ली- मुंबई फ्रेट कॉरिडॉरचे काम मार्चपर्य़ंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे कंटेनरचा ३० ते ३५ टक्के भार त्या मार्गावर जाणार आहे. तसेच, खानिवडे ते आमणे येथील मिसिंग लिंक जोडल्यास घोडबंदर रोडवरील आणखी भार कमी होणार आहे. त्यासाठी महापालिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकऱणाकडे पाठपुरावा करीत आहे. हा विषय जलद मार्गी लागावा यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे लवकरच बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही या बैठकीत खासदार म्हस्के यांनी दिल्या.


        त्याचवेळी, घोडबंडर रोड आणि इतर रस्त्याचा स्वीकार करण्यास महापालिका तयार आहे. मात्र, हस्तांतरणापूर्वी, सध्या या रस्त्याचा ताबा ज्या यंत्रणांकडे आहे, त्यांनी ते रस्ते सुस्थित आणून ठेवावेत. मगच महापालिका त्यांचा ताबा घेईल, असे या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले. 


         वाहतूक, रिक्षा आदींबाबत काहीही तक्रारी असतील तर त्या नागरिकांनी महाट्र्रॅफिक या पोलीसांच्या अ्ॅपव नोंदवाव्यात, असे आवाहन यावेळी पोलीस उपायुक्त (वाहतूक) पंकज शिरसाट यांनी केले. 


        या बैठकीत, जस्टिस फॉर घोडबंदर रोड या संस्थेच्या प्रतिनिधींनी तसेच परिसरातील नागरिकांनी घोडबंदर परिसरातील अंतर्गत रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, वाहतूक कोंडी आदींबाबत विविध समस्या आणि सूचना मांडल्या. माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी  साकेत ते गायमुख या कोस्टल रोडचा गायुमख ते फाऊंटन-वर्सोवा इथपर्यंत विस्तार करण्याची सूचना  मांडली. तसेच, ओवळा-मोघरपाडा हा अंतर्गत रस्ता विकसित केल्यास त्याचा परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत