राजमाता जिजाऊ उद्यानाला मिळणार झळाळी, आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांची घेतली भेट.
हिरानंदानी येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील नूतनीकरण आणि सुविधांबाबत आमदार संजय केळकर यांनी ठामपा आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषद सदस्य ॲड. निरंजन डावखरे देखील उपस्थित होते.
राजमाता जिजाऊ उद्यानासाठी राज्य शासनाने चार कोटींचा निधी मंजूर केला असून त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्याबाबतचा आराखडा आयुक्तांनी दाखवला. यावेळी श्री.केळकर यांनी विविध सूचना केल्या. अनेक उद्यानांच्या नूतनीकरणासाठी किंवा नव्याने निर्मिती करण्यासाठी खासदार-आमदारांचा निधी वापरला जातो, पण कालांतराने या उद्यानांकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांची दुरवस्था होते. हे टाळण्यासाठी एनजीओना उद्यानांची जबाबदारी द्यावी, उद्यानांच्या जोपासनेसाठी महापालिकेने आर्थिक तरतूद करावी अशी सूचना श्री.केळकर यांनी केली. राजमाता जिजाऊ उद्यानात तूर्तास जिजाऊंचे तैलचित्र स्थापन करण्यात यावे, पुढील काळात मंजुरी मिळाल्यानंतर पुतळाही उभारण्यात यावा, यावर आयुक्तांनी सहमती दर्शवली.
काही दिवसांपूर्वी या उद्यानातील राजमाता जिजाऊ उद्यान या नावाचे फलक उद्यान विभागाकडून काढण्यात आल्याने मराठा समाज आक्रमक झाला होता. मराठा आंदोलकांनी केलेल्या मागणीनुसार आयुक्तांनी हा फलक पुन्हा उभारण्याचे मान्य केले, असे श्री.केळकर यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर टीका केली. अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी जागरूक नागरिकांना दरवेळी न्यायालयात जावे लागते, कोर्टाच्या आदेशानंतरच कारवाई केली जाते. ही बाब संतापजनक आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई करावी. केवळ निवडणूक आली म्हणून आंदोलने न करता भाजप वर्षभर नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी सक्रिय असतो, भ्रष्टाचारावर आसूड ओढत असतो, असेही श्री. केळकर यांनी स्पष्ट केले.

Post a Comment