रमाबाई नगरमध्ये आता ' माता रमाबाईं आंबेडकरांचे' स्मारक उभारणार


धम्मचक्र परिवर्तन दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

माता रमाबाई नगरात नव्या पुनर्विकास युगाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते मुहूर्तमेढ

रमाबाई नगरातील क्लस्टर प्रकल्पाचा शुभारंभ; 17 हजार कुटुंबांचे घरांचे स्वप्न महायुती सरकार पूर्णत्वास नेणार

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासोबतच आता त्यांच्या सहचारिणी माता रमाबाई आंबेडकर यांचे स्मारक देखील उभारले जाणार आहे. रमाबाई नगरातील क्लस्टर पुनर्विकास योजनेतून हे स्मारक उभारले जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते माता रमाबाई नगर आणि कामराज नगर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. त्यावेळी शिंदे बोलत होते.


शिंदे पुढे म्हणाले, “माता रमाबाई यांना माझे विनम्र अभिवादन. धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा सर्वांना. कमिटीच्या मागणीनुसार या दिवशी भूमिपूजन होत असल्याने हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे.”


त्यांनी उपस्थितांना उद्देशून हिंदी शायरीतून सांगितले की “आज का दिन है महान, खुश रहे यहां का इंसान, खत्म हो गई इंतजार की घडियां, अब मिलेगा आपके सपनों का मकान.”

यातून रहिवाशांचे घराचे स्वप्न आता पूर्णत्वास जात असल्याचे संकेत त्यांनी दिले.


शिंदे म्हणाले की, “गेल्या 40 वर्षांपासून येथील लोक कठीण परिस्थितीत जगत आहेत. आज त्यांचा खडतर प्रवास संपला आहे. पुढील तीन-चार वर्षांत 17 हजार कुटुंबांचे आयुष्य उजळून निघेल. दिवाळी पुढच्या आठवड्यात असली तरी या रहिवाशांची खरी दिवाळी आजच साजरी झाली आहे.”


या योजनेचा प्रयत्न पंधरा वर्षांपासून सुरू आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात सुरुवात झाली, मात्र गती देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मिळाली. “मुख्यमंत्री म्हणून मी या योजनेला पुढे नेले. येथे कोणताही खाजगी बिल्डर नाही; एमएमआरडीएच हा प्रकल्प राबवत आहे. त्यामुळे दर्जेदार घरे वेळेत मिळतील, याची मी खात्री देतो,” असे शिंदे म्हणाले.


शिंदे यांनी सांगितले की, “मी मुख्यमंत्री असताना भाडे वाटपाचे चेक देण्यासाठी आलो होतो. दीडशे कोटी रुपयांचे चेक दिले, त्यानंतर रहिवाशांचा विश्वास बसला की घरे नक्की मिळतील.”


त्यांनी सांगितले की, “एमएमआरडीए आणि एसआरए हे प्रकल्प वेळेत पूर्ण करतील. 40 लाख मुंबईकरांना मोफत घरे देण्याचे स्वप्न स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिले होते. आता महायुती सरकार त्या दिशेने काम करत आहे.”


क्लस्टर योजनेमुळे जनतेचे जीवनमान उंचावेल, पुनर्विकासाचा हा फक्त ‘ट्रेलर’ असून ‘पिक्चर अभी बाकी है’, असे म्हणत शिंदे यांनी पुढील प्रकल्पांची झलक दिली.


“म्हाडा, सिडको, एसआरए, बीएमसी, एमआयडीसी यांच्या माध्यमातून प्रलंबित प्रकल्प पूर्ण करू. एसआरएच्या धोरणात बदल करून परवडणारी घरे, नोकरदारांसाठी वसाहती, विद्यार्थी निवास, पोलिस आणि गिरणी कामगारांसाठी घरे देण्याचा निर्णय घेतला आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.


“मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नव्हे तर विकासाचे वारकरी हवे आहेत. मुंबईला स्थगिती नव्हे तर प्रगती हवी आहे. हे सरकार म्हणजे निर्णय घेणारे सरकार आहे, आणि ते म्हणजेच महायुतीचे सरकार,” असे शिंदे यांनी ठामपणे सांगितले.


पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले.

“भिमाची आठवण कधीच मिटणार नाही. सागराचे पाणी आटेल, पण बाबासाहेबांचे उपकार आपण कधीच विसरू शकणार नाही,” असे सांगत शिंदे यांनी भाषणाचा समारोप केला.


या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार राम कदम, पराग शहा, मिहिर कोटेचा, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, माजी नगरसेवक परमेश्वर कदम आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत