ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे धरणे आंदोलन

ठाणे - राज्याच्या विविध जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याऐवजी हे सरकार फसव्या घोषणा करीत आहेत, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळे कपडे परिधान करून तसेच काळ्या फिती बांधून धरणे आंदोलन करीत "काळी दिवाळी" साजरी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 


अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, कापूस, मूग, ऊस, उडीद आदी विविध पिकांचे अतोनात नुकसान झाले. पण आतापर्यंत झालेल्या नुकसानीपैकी निम्म्या हेक्टरवरील पंचनामे अ‌द्यापही बाकी आहेत. ते पूर्ण होण्यासाठी आणखी किती कालावधी लागेल हे माहित नाही. अतिवृष्टीने काढणीला आलेली पिके वाहून गेली, गोठ्यातील दुभती जनावरं, बैल, शेळ्या, कोंबड्या वाहून गेल्या तरी या सरकारनेही अ‌द्याप मदत दिलेली नाही. अशा परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करायची या चिंतेत शेतकरी आहे. मात्र,  सरकारकडून ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत,  त्यानिषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. 


 यावेळी,  शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ७५ हजार रुपये देण्याची आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी ;  सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत  देणारा कायदा करावा.;  परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेवर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी; अतिवृष्टी किंवा इतर नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई त्वरीत मिळावी;  शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा;  गिरणा ते मन्याड जोड कालवा यांसारख्या प्रलंबित जलसिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत; शेती पंचनामे वेळेवर न करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी; दिव्यांग शेतकरी, मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.


या बाबत पत्रकारांशी बोलताना मनोज प्रधान म्हणाले की, पॅकेजच्या नावाखाली या सरकारने अतिवृष्टीग्रस्तांची मोठी फसवणूक केली आहे. दिवाळीपूर्वी मदत जाहीर करण्याचं आश्वासन तर हवेतच विरलं. सरसकट कर्जमाफी करण्याची आज खरी गरज असताना सरकार कर्जमाफीचा " क "  शब्दही उच्चारायला तयार नाही. हेक्टरी ५० हजार रुपये मदत देण्याऐवजी केवळ आकडेमोड करून शेतकऱ्यांना चुना लावण्याचं काम केलं. पण आम्ही मात्र त्यासाठी जनतेच्या सहकार्याने रस्त्यावरचा संघर्ष करू आणि या सरकारला सरसकट कर्जमाफी, हेक्टरी ५० हजार रुपये मदत आणि यासह इतर सर्व मागण्या मान्य करण्यास भाग पाडू.


या आंदोलनात  राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, मा. नगरसेवक प्रकाश बर्डे, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग,  महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन,  युवक अध्यक्ष अभिजीत पवार,  युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य,  एड. कैलास हावळे, पूजा शिंदे, राजेश साटम, गजानन चौधरी ,  राजेश खारकर,  सुभाष यादव,राजू पाटील, राजेश मिश्रा, राजू चापले, कैलास सूरकर, उमेश द्विवेदी, प्रदीप साटम, महेंद्र पवार, आशिष खाडे,संजीव दत्ता, राजू शिंदे, इकबाल शेख, उमेश अगरवाल, रोहिदास पाटील,ज्ञानेश्वर राजपंके अंकुश मढवी, दिगंबर गरुड, नितीश पवार, विक्रांत घाग, शिवा कालुसिंग, एकनाथ जाधव, प्रविण सिंह, रिंकू सिंह, विशांत गायकवाड, रमझान शेख, साहिल उदुगडे,गणेश मोरे, विक्रम सिंह, हरिवंश चौहान,मेघा गवते, सुनीता मोकाशी, मल्लिका पिल्लई, फुलबानो पटेल आदी सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत