महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांची चाचणी
ठाणे:फटाक्यांच्या आतिश बाजी शिवाय दिवाळी साजरी करणे उत्सव प्रेमींना शक्य होत नाही. त्यामुळेच या सणाचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा वापर होतो. मात्र हेच फटाके हवा आणि ध्वनी प्रदूषण करणारे ठरू लागल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यावर बंदी घातली आहे. फटाके उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना त्याबाबतचे सक्त निर्देश देण्यात आले असून नियमांचा भंग करणाऱ्या कारखाने आणि विक्रेतांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठाण्यात 25 प्रकारच्या फटाक्यांची चाचणी घेण्यात आली. प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुढाकार घेतला आहे. बाजारात विक्रीसाठी आलेल्या फटाक्यांवर मंडळाची नजर असून प्रदूषण पसरवणारे संशयित फटाके ताब्यात घेऊन त्यांची गुरुवारी मोकळ्या मैदानात फटाके फोडून चाचणी घेण्यात आली. यावेळी मंडळाने उप प्रादेशिक अधिकारी आनंद काटोले, उप प्रादेशिक अधिकारी संजीव रेदासानी, ठाणे महानगरपालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ केमिस्ट ओम परळकर, स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment