CISCE रिजनल क्रिकेट टुर्नामेंटमध्ये वसंत विहार शाळेचा झेंडा
14 वर्षाखालील मुलींची संपूर्ण टीम नॅशनलसाठी सिलेक्ट
ठाणे - शालेय क्रिकेटमध्ये मानाची स्पर्धा असलेल्या कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन् अर्थात CISCE टुर्नामेंटसाठी ठाण्यातील वसंत विहार शाळेच्या आणि भांडुपच्या पवार पब्लिक स्कूलच्या 14 वर्षाखालील मुलींचा समावेश असलेल्या झोन सी संघाने झोन इ संघाचा अंतिम सामन्यात दारुण पराभव करत ठाण्याचे नाव मोठे केले. हे सामने पुण्यातील कॅम्प येथील बिशप हायस्कूल येथे पार पडले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही अंडर 14 ची संपूर्ण टीम आता नॅशनल साठी सिलेक्ट झाली असून पुढच्याच आठवड्यात उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे खेळायला जाणार आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, शालेय क्रिकेटमध्ये मानाची स्पर्धा समजल्या जाणाऱ्या कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन् अर्थात CISCE टुर्नामेंट नुकतीच पुण्यात पार पडली. या टुर्नामेंट मध्ये झोन सी रिजनमधून ठाण्यातील वसंत विहार शाळेच्या 11 तर भांडुप येथील पवार पब्लिक स्कूलच्या 6 मुलींची निवड झाली होती. मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी पुण्यातील कॅम्प परिसरात बिशप हायस्कूल येथे या राज्य पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत झोन सी संघाने साखळी सामन्यात विजय मिळवून अंतिम सामना गाठला. झोन सी संघाविरुद्ध झोन इ संघाचा अंतिम सामना झाला. या सामन्यात झोन सी संघाने प्रथम फलंदाजी करत 12 ओव्हर मध्ये 2 विकेटच्या बदल्यात 110 धावा केल्या. या 110 धावांचा पाठलाग करताना झोन इ संघ अक्षरशः ढेपाळला. अवघ्या साडेसहा ओवर मध्ये अख्खा संघ गारद होत त्यांनी कशाबशा अवघ्या 19 धावा केल्या. झोन सी संघाच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावर यष्टिरक्षक कु. काव्या पष्टे हिने चमकदार कामगिरी करत तब्बल सहा खेळाडूंना यष्टीचीत केले. ती या सामन्याची प्लेअर ऑफ मॅच ठरली. तर कर्णधार कु. दिलीशा आंगचेकर हिने सर्वाधिक वीस धावा केल्या तर गोलंदाज कु. गौतमी मोरे हिने अवघ्या 1.3 ओव्हर मध्ये 5 धावा देत 3 विकेट मिळवून बेस्ट बॉलर ठरली.
या संघाचे मुख्य प्रशिक्षक किरण साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोच प्रशांत मोरे आणि स्वाती पाटील यांनी केलेल्या नियोजनामुळे हा विजय मिळवता आल्याचे सांगितले जात आहे. राज्यपातळीवरील CISCE सारखी मानाची क्रिकेट स्पर्धा जिंकल्याने वसंत विहार शाळा आणि पवार पब्लिक स्कूलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आनंदाचा डबल धमाका
एकीकडे 14 वर्षाखालील मुलींच्या संघाने CISCE रिजनल क्रिकेट ही मानाची स्पर्धा जिंकल्याचा आनंद व्यक्त होत असताना दुसरीकडे हा संपूर्ण संघ आता नॅशनल साठी सिलेक्ट झाला आहे. येत्या 14 ते 16 सप्टेंबर रोजी हे सामने उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे होणार आहेत. या स्पर्धेत या मुली महाराष्ट्राच्या अंडर 14 संघाचे नेतृत्व करणार आहेत. त्यामुळे वसंत विहार हायस्कूल आणि मुख्य प्रशिक्षक किरण साळगावकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment