ठाणे महापालिकेतर्फे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेत शिवसम्राट मित्र मंडळ ठरले पहिल्या क्रमांकाचे मानकरी


स्वच्छता पुरस्कारात प्रथम - काजूवाडी वैती नगर रहिवासी मंडळ, काजूवाडी

उत्कृष्ट मूर्तीकाराचा प्रथम क्रमांक -राकेश घोष्टीकर, श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ


            ठाणे :ठाणे महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धा २०२५चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या आरास स्पर्धेमध्ये ठाण्यातील शिवसम्राट मित्र मंडळाने प्रथम पारितोषिक पटकाविले. तर, कळवा येथील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दुसरा आणि कोलबाड मित्र मंडळाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. काजूवाडी वैती नगर रहिवासी मंडळ, काजूवाडी यांना स्वच्छता पुरस्कारात प्रथम आणि  राकेश घोष्टीकर, श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ यांना उत्कृष्ट मूर्तीकाराचा प्रथम क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या तसेच, विजयी ठरलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळांचे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिनंदन केले आहे.

         ठाणे महापालिकेच्यावतीने घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आरास स्पर्धेत ठाण्यातील एकूण १६ मंडळांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षण करताना मूर्ती, सजावट, विषय मांडणी, हेतुपूर्ती, शिस्त व स्वच्छता तसेच कलावंतांचे काम या सर्व घटकांचा विचार करण्यात आला. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी व किशोर नादावडेकर आणि ठाणे वैभवचे ज्येष्ठ पत्रकार आनंद कांबळे यांनी केले.


     या स्पर्धेमध्ये प्रथम आलेल्या शिवसम्राट मित्र मंडळाने 'मंडळ आहे ना?' या विषयावर देखावा साकारला होता. तर द्वितीय क्रमांक मिळविलेल्या गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 'रान बोलतंय - जंगलाची शिकवण' या विषयावरील देखावा चित्रफितीच्या माध्यमातून साकारला होता. तृतीय क्रमांक पटकाविलेल्या कोलबाड मित्र मंडळाने 'अवयव व देहदान' या विषयावर देखावा साकारून नागरिकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती केली होती. तर, उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविणाऱ्या गोपाळ गणेश मित्र मंडळाने 'पर्यावरण आणि स्वार्थी मनुष्य' या विषयांवरील देखावा साकारून पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले.




      या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे.

        उत्कृष्ट सजावट


१. प्रथम क्रमांक (रुपये २५ हजार) - शिवसम्राट मित्र मंडळ, गांधीनगर.

२. द्वितीय क्रमांक (रुपये २० हजार) - गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कळवा

३. तृतीय क्रमांक (रुपये १५ हजार) - कोलबाड मित्र मंडळ, कोलबाड.

४. उत्तेजनार्थ (रुपये १० हजार)  - गोपाळ गणेश मित्र मंडळ - आझाद नगर.

        उत्कृष्ट मूर्तीकार 

१. प्रथम क्रमांक (रुपये १० हजार)  - राकेश घोष्टीकर - श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ

२. द्वितीय क्रमांक (रुपये ७ हजार)  - मदन नागोठणेकर- सार्वजनिक उत्सव मंडळ

३. तृतीय क्रमांक (रुपये ५ हजार) - मिलिंद सुतार - जय भवानी मित्र मंडळ

       स्वच्छता पुरस्कार

१. प्रथम क्रमांक (रुपये १० हजार)  - काजूवाडी वैती नगर रहिवासी मंडळ, काजूवाडी

२. द्वितीय क्रमांक (रुपये ७ हजार)  - शिवगर्जना मित्र मंडळ, उथळसर

३. तृतीय क्रमांक (रुपये ५ हजार) - स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ, सावरकर नगर 


     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत