'जनसेवकाचा जनसंवाद' कार्यक्रमात जागीच झाले समस्यांचे निरसन
ठाणे:खोपट येथील भाजपच्या कार्यालयात आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात महापालिका, प्रशासन आणि नागरी सुविधांसंबंधी अनेक समस्या नागरिकांनी मांडल्या. यावेळी श्री. केळकर यांनी अनेक समस्या संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून जागीच मार्गी लावल्या.
प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत भाजप कार्यालय, खोपट, ठाणे येथे नागरिकांच्या समस्या निर्मूलनासाठी हा उपक्रम आयोजित केला जातो.
आज झालेल्या कार्यक्रमात ठाणे आणि आसपासच्या भागातील अनेक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. शिक्षणासंबंधी मदत, सायकल ट्रॅक विषय, प्रवेश प्रक्रिया, रोजगार, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, स्मार्ट मीटर, पोलीस ठाणे तसेच महापालिकेशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा होऊन योग्य मार्ग काढण्यात आला.
या उपक्रमास आमदार संजय केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे, भाजप शहर उपाध्यक्ष महेश कदम, ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील, ओंकार चव्हाण आणि भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
आजवर झालेल्या या कार्यक्रमांमध्ये सदर झालेल्या तक्रारींपैकी ५०टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निरसन झाले असून काही तक्रारी जागीच तर काही तक्रारींचे निरसन करण्यासाठी पाठपुरावा सुरू असतो. त्यामुळे तक्रारदार नागरिकांचे समाधान होत असून या उपक्रमाबाबत विश्वासार्हता वाढत आहे. परिणामी या उपक्रमात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे, अशी माहिती श्री. केळकर यांनी दिली.
Post a Comment