मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रस्ते विकासाची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
मुंबई – ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्र. ४, ५ व ६ या परिसरातील मंजूर विकास आराखड्यानुसार नियोजित रस्त्यांचा विकास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांच्यामार्फत करण्यात येत आहे. घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्यांची कामे डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावीत. असे निर्देश परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिले. ते मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रातील MMRDA च्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेत असताना बोलत होते. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची अतिरिक्त आयुक्त आश्विनकुमार मुदगल व विक्रम कुमार यांच्यासह अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की,या प्रकल्पांतर्गत ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या परिसरातील डी.पी. रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले सेवा मार्ग हे ३१ डिसेंबर अखेर मुख्य रस्त्याला जोडण्यात यावेत. तसेच मेट्रो स्थानका चे जिने रस्त्याच्या मधोमध न उतरता ते रस्त्याच्या दोन्ही कडेला उतरण्यात यावेत.अशा सूचना यावेळी मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सदर प्रकल्प राबविल्यामुळे घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच परिसरातील नागरिकांना पर्यायी रस्ते उपलब्ध होतील. त्याचप्रमाणे २० रस्त्यांपैकी ५ रस्त्यांचे स्वतंत्र सर्वेक्षण सुरू असून, उर्वरित १० रस्त्यांचे नवीन विकास काम लवकरच अंतिम करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी MMRDA व ठाणे महापालिका प्रशासनाने एकमेकांना सहकार्य करून गतीने प्रकल्प पूर्ण करावेत असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी केले.
Post a Comment