मंगळवारच्या एेवजी आता शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही
ठाणे : मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात जलवाहिनी तातडीच्या दुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर पाणी कपात आहे. त्यात, मंगळवारी स्टेम प्राधिकरणातर्फे शटडाऊन घेतल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, स्टेम प्राधिकरणाने मंगळवार, २२ जुलै रोजीचे दुरुस्तीसाठीचे शटडाऊन आता शुक्रवार, २५ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे कळवले आहे.
या बदललेल्या वेळापत्रकानुसार, आता ठाणे महापालिका क्षेत्रातील काही भागात मंगळवार, २२ जुलै रोजीएेवजी शुक्रवार,२५ जुलै स. ९.०० वाजल्यापासून शनिवार, २६ जुलै रोजी स. ९.०० वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या काळात, ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेचे नियोजन करुन टप्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकुम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कम्पाउंड, डोंगरी पाडा, वाघबीळ इत्यादी ठिकाणाचा पाणी पुरवठा शुक्रवार दि .२५/०७/२०२५ सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत बंद राहील.
तर, समतानगर, ऋतु पार्क, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेती बंदर, कळवा व मुंब्र्याचा काही भाग येथे शुक्रवार दि. २५/०७/२०२५ रोजी रात्री ९.०० ते शनिवार, दि. २६/0०७/२०२५ रोजी सकाळी ९.००वा. पर्यंत बंद राहील.
शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्रावर मीटर बदलण्याचे काम व शहाड येथील अशुध्द जल उदंचन केंद्र येथे होत असलेली पाईपलाईन गळती बंद करणे व इतर आवश्यक कामे महावितरण कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी स्टेम प्राधिकऱणाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्व पदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य साठा करुन ठेवावा. पाणी जपून वापरावे व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
Post a Comment