ठाणे महापालिका चषक ३१व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार, १० ऑगस्ट रोजी आयोजन


महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली घोषणा
सहा वर्षांनी होणार ठाणे वर्षा मॅरेथॉन

एकूण १० लाख ३८, ९०० रुपयांची पारितोषिके
प्रत्येक गटात प्रथम १० विजेत्यांना पारितोषिके व चषक

            ठाणे : ठाणे महापालिका चषक ३१व्या वर्षा मॅरेथॉनचे रविवार, १० ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात येत असल्याची घोषणा ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी केली. ३०वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा २०१९मध्ये झाली होती. आता सहा वर्षांनी पुन्हा देशविदेशातील मॅरेथॉनपटूंसह ठाणेकर नागरिक या मॅरेथॉनमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होऊ शकणार असल्याचे प्रतिपादन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

             ठाणे महापालिका चषक ३१वी वर्षा मॅरेथॉन ही ठाण्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मॅरेथॉन आहे. सहा वर्षांच्या खंडानंतर ही मॅरेथॉन होत असल्याने सर्व विभागांनी उत्तम समन्वय साधून ही मॅरेथॉन यशस्वी करावी. गेल्या सहा वर्षात शहराच्या रचनेत, पायाभूत सुविधांमध्ये बदल झाला आहे. हे लक्षात घेऊन सर्व मॅरेथॉन मार्गांचे नियोजन करावे, असे आयुक्त राव यांनी नमूद केले. 

          'सर्व अधिकाऱ्यांनी मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा'

          सर्व महापालिका अधिकाऱ्यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घ्यावा, असे निर्देश आयुक्त राव यांनी दिले. तसेच, त्यासाठी आतापासूनच दररोज तयारीला लागावे, असेही आयुक्त राव म्हणाले. 

            प्रथम पारितोषिक एक लाख रुपयांचे

            या मॅरेथॉनचे आयोजन ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होते. असोसिएशच्या सूचनेनुसार, एकूण १० लाख ३८, ९०० रुपयांची पारितोषिके, चषक व पदके असतील. प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास एक लाख रुपयांचे पारितोषिक आहे. तर, प्रत्येक गटात प्रथम १० विजेत्यांना पारितोषिके व चषक देण्यात येणार आहेत, असेही आयुक्त राव यांनी जाहीर केले.

           ठाणे महापालिका चषक ३१व्या वर्षा मॅरेथॉनचे स्पर्धेच्या आयोजनाबाबत गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासमोर क्रीडा विभागाच्या वतीने सविस्तर सादरीकरण केले. उपायुक्त (क्रीडा) मीनल पालांडे यांनी २०१९ची मॅरेथॉन स्पर्धेचा आढावा आणि २०२५ची प्रस्तावित स्पर्धेची रुपरेखा या बैठकीत मांडली. त्याप्रसंगी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त मनीष जोशी, उमेश बिरारी, दिनेश तायडे, सचिन सांगळे, उपनगर अभियंता विकास ढोले, विनोद पवार आणि शुभांगी केसवानी, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त, सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

          मॅरेथॉनमध्ये एकूण १२ गट

            ठाणे महापालिका चषक ३१व्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत एकूण १२ गट असतील. राज्यस्तरीय गटामध्ये खुला गट (महिला व पुरुष)- २१ किमी, १८ वर्षावरील (महिला व पुरुष)- १० किमी, १८ वर्षाखालील (मुले व मुली)- १० किमी असे विभाग आहेत. तर, जिल्हास्तरीय गटात १५ वर्षाखालील (मुले व मुली)- ०५ किमी, १२ वर्षाखालील (मुले व मुली)- ०३ किमी, ज्येष्ठ नागरिक (पुरुष आणि महिला) - ५०० मीटर या गटांचा समावेश आहे.

            कॉर्पोरेट गट

          या मॅरेथॉनमध्ये माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, महापालिकेचे माजी अधिकारी यांच्यासाठी कॉर्पोरेट गट करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी १ किमी अंतराची स्पर्धा ठेवण्यात आली आहे.

           यंदा २५००० धावपटू अपेक्षित

           सन २०१९मधील मॅरेथॉनमध्ये एकूण २३००० खेळाडू सहभागी झाले होते. त्यात, सैनिक शाळा, ठामपा शाळा, खाजगी शाळा यांचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. याही वर्षी सुमारे २५००० खेळाडू मॅरेथॉनमध्ये सहभागी होणे अपेक्षित असल्याची माहिती उपायुक्त पालांडे यांनी दिली. 

         नोंदणी पुढील आठवड्यापासून

         मॅरेथॉन करता नोंदणी पुढील आठवड्यापासून सुरू होणार असून विविध गटांच्या मार्गिका आणि सविस्तर कार्यक्रम टप्प्याटप्य्याने जाहीर करण्यात येईल, असेही उपायुक्त पालांडे यांनी स्पष्ट केले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत