"खते कुठे उपलब्ध?" आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार दैनंदिन माहिती
जिल्हा परिषद, ठाणे कृषि विभागाचा अभिनव उपक्रम; Blogspot द्वारे खत साठा व उपलब्धतेची माहिती ऑनलाईन
(जिल्हा परिषद, ठाणे) - जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत कृषि विभागाने शेतकऱ्यांना रासायनिक खतांची माहिती घरबसल्या, सहज उपलब्ध व्हावी यासाठी Blogspot या लोकप्रिय आणि सुलभ माध्यमाचा वापर करून खते माहिती प्रणाली सुरू केली आहे.
ठाणे जिल्ह्यात सध्या एकूण १६२ रासायनिक खत विक्री केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांवरून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानित खतांची विक्री करण्यात येते. मात्र अनेकदा खतांची उपलब्धता कळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना वेळ व संसाधनांचा अपव्यय होतो. याला पर्याय म्हणून कृषि विभागाने तयार केलेला Blogspot (https://adothane.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding_72.html) हा पर्याय शेतकऱ्यांसाठी एक प्रगत व पारदर्शक डिजिटल साधन ठरत आहे.
या Blog च्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांचा साठा, खतांचे प्रकार, केंद्र चालकांचा मोबाईल क्रमांक, यासारखी माहिती सहज मिळते. जिल्हानिहाय, तालुकानिहाय आणि केंद्रनिहाय माहिती ही या प्लॅटफॉर्मवर दैनंदिन अद्ययावत करण्यात येते. परिणामी शेतकरी खत खरेदीचे अचूक नियोजन करू शकतात आणि गरजेनुसार योग्य केंद्राची निवड करू शकतात.
Blogspot वापरणे अत्यंत सुलभ आहे. हे कोणत्याही स्मार्टफोनवर मोफत आणि कोणतीही अॅप डाऊनलोड न करता चालते. सदर माहिती संपूर्णपणे पारदर्शक व सार्वजनिक वापरासाठी खुली आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला योग्य वेळेत योग्य माहिती मिळू शकते.
या उपक्रमाबाबत कृषि विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर यांनी सांगितले की,"डिजिटल यंत्रणांचा प्रभावी वापर करून आम्ही शेतकऱ्यांना वेळेत आणि अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहोत. या उपक्रमामुळे खत खरेदी सुलभ होणार असून, शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचतील. भविष्यात अधिकाधिक सुविधा या Blogspot च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे."
Post a Comment