घोडबंदर रोड येथील संथ गती कामामुळे नागरिक हैराण ,प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाणे काँग्रेसचे निषेध आंदोलन

 


ठाणे(प्रतिनिधी): घोडबंदर रोड येथे MMRDA, महानगरपालिकेसह  विविध यंत्रणांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.सदरची विकासकामे अगदी संथ गतीने सुरू असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणात त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.प्रचंड वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर मेट्रो सह घोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम, उड्डाण पूल व त्यावर पडलेले खड्डे,उघडी गटारे,विविध ठिकाणी केलेले खोदकाम यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहतूक कोंडी मुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठाणे शहर काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घोडबंदर रोड येथील आनंद नगर नाका येथे लक्षवेधी निषेध आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला माजी मंत्री आ.डॉ.जितेंद्र आव्हाड,धर्मराज्य पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्यासह विविध संघटनांनी उपस्थित रहात पाठिंबा दिला.*या आंदोलनाला भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी पाठिंबा देऊन मुख्यमंत्र्यांचे निवेदन स्वीकारले आणि याबाबत अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे सांगितले.*

      यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की मेट्रो मार्गासाठी व कारशेडसाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादनामध्ये झालेला विलंब यामुळे कारशेडची निर्मिती नाही,बऱ्याच ठिकाणी मेट्रोचे पिलर्स उभारलेले नाही, मेट्रो स्टेशनचे अपूर्ण असलेली कामे, उभ्या केलेल्या पिलर्स वर न टाकलेले गर्डर, अशा अनेक अपुऱ्या व त्रुटींजन्य कामामुळे  अनेक वर्षे रखडलेले मेट्रोचे काम नजीकच्या काळात देखील मार्गी लागणार नाही असे एकंदर परिस्थितीनुसार दिसून येते.तसेच गर्दीच्या वेळात बंदी असतानाही अवजड वाहनांना शहरात दिलेला प्रवेश, वाहतूक पोलीस व ट्राफिक वॉर्डन यांची कमतरता,शहरातील चालू असलेली बेकायदा प्रवासी वाहतूक, ट्रक टर्मिनस बस डेपो यासारख्या सुविधांचा अभाव, कंत्राटदाराकडून होणारे अटी शर्तींचे उल्लंघन,महापालिका व एम.एम आर.डी.ए यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी तज्ञ अधिकाऱ्यांचा अभाव,या सर्व गोष्टी वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत व यामुळे मागील दहा ते पंधरा वर्षात अनेक लोकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत.वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाने केलेले दुर्लक्ष व कामातील हलगर्जीपणा यामुळे ही कामे रखडली असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले असे सांगत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला.

       प्रशासकीय यंत्रणेने तातडीने त्यांच्या मागण्यांची दखल घेतल्यानंतर पाच तासानंतर निषेध आंदोलन मागे घेण्यात आले.  परंतु आजच्या आंदोलनातूनही प्रशासनाने सकारात्त्मक पावले उचलून योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर आम्हाला उग्र आंदोलन छेडावे लागेल असा इशाराही ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत रोष देखील व्यक्त केला.

            या आंदोलनात ठाणे काँग्रेस चे प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह भालचंद्र महाडिक,राजेश जाधव,प्रदीप राव,रमेश इंदिसे,महेंद्र म्हात्रे,रवींद्र कोळी,उमेश कांबळे,निशिकांत कोळी,स्मिता वैती,संगीता कोटल,शीतल अहेर,शिल्पा सोनोने,हिंदुराव गळवे,अजिंक्य भोईर,स्वप्नील कोळी,उमेश सिंग,श्रीकांत गाडीलकर,अंजनी सिंग, निलेश पाटील,वसीम सय्यद,राजु शेट्टी,यासीन मोमिन,जयेश परमार,  नुर्शिद शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत