आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटीबध्द - पालकमंत्री गणेश नाईक

 


पालघर - आदिवासी विकास विभागामार्फत कार्यान्वित असलेल्या २९ प्रकल्पांच्या माध्यमातून आदिवासी जनहिताय हे ब्रीद घेऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दर्जेदार शिक्षण व उत्तम भौतिक सुविधा देण्यासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन वनमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.


एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा, कळमदेवी ता. डहाणू येथे प्रत्यक्ष तसेच शासकीय आश्रमशाळा, डोंगारी ता. तलासरी व शासकीय आश्रमशाळा एंबूर ता.जि.पालघर येथील नुतन शालेय इमारतीचे उद्घाटन व विज्ञान केंद्र भूमिपूजन दूरदृष्य प्रणालीद्वारे वनमंत्री तथा पालघर जिल्हयाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते कळमदेवी ता.डहाणू येथे संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.


या कार्यक्रमास खा. हेमंत सवरा, आ. विनोद निकोले, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, प्रकल्प अधिकारी डहाणू सत्यम गांधी आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.


पालकमंत्री श्री. नाईक म्हणाले की, डहाणू प्रकल्पांतर्गत ३३ शासकीय आश्रमशाळांमधून ९ हजार ६० मुले व ९ हजार १३२ मुली असे एकूण १८ हजार २२१ विद्यार्थी ज्ञानार्जनाबरोबरच उत्तम नागरिकत्वाचे धडे घेत आहेत. दऱ्याखोऱ्यात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व उत्तम भौतिक सुविधांच्या उपलब्धतेसाठी प्रकल्पांतर्गत ७ शालेय इमारती, १ मुलांचे वसतीगृह व १३ मुलींच्या वसतीगृहांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तसेच धरती आबा योजनेंतर्गत ७ मुलांचे वसतीगृह बांधकामास मंजूरी प्राप्त झाली असून या वसतीगृहाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. शैक्षणिक संस्थेच्या इमारतीचे लोकार्पण होणे हे जिल्हयाच्या प्रगतीसाठी सकारात्मक पाऊन असून जिल्हयातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवाह हा अखंड वाहत राहणार असल्याचे पालकमंत्री श्री. नाईक यांनी सांगितले.


प्रधानमंत्री आवासयोजने अंतर्गत पालघर जिल्हयामध्ये मोठ्या प्रमाणात गरजूंना घरकूल प्राप्त झाले आहे. पालघर जिल्हयातील दुर्गम भागामध्ये रोजगार निर्मितीसाठी स्थानिक ठिकाणी विविध कंपन्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. दुर्गम भागामध्ये उद्योग स्थापन करणाऱ्या कंपन्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध सवलती लागू करण्यात येतील. वाढवण बंदर जगातील १० उत्कृष्ट बंदरांपैकी एक बंदर असणार आहे. वाढवण बंदराच्या जवळच बुलेट ट्रेनचे स्टेशन असणार आहे. तसेच बंदराच्या जवळ आठ पदरी महामार्ग नाशिक निर्माण करण्यात येणार आहे. या बंदराच्या जवळ आधुनिक पध्दतीचे विमानतळ देखील होणार आहे. या विमानतळावरून येत्या पाच वर्षामध्ये विमानाचे उड्डाण होणार आहे. ७५ लाख कोटीच्या माध्यमातून सी पोर्ट होणार आहे. हा प्रकल्प होत असतांना विस्तापित होणारे स्थानिक तसेच प्रकल्पासाठी योगदान देणारे स्थानिक यांचे पुर्नवसन पूर्ण करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शासनास सहकार्य केल्यास जिल्हयाचा विकास अधिक गतीने होईल असा विश्वास पालकमंत्री श्री. नाईक यांनी व्यक्त केला.


पालघर जिल्हयाच्या विकासामध्ये जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी प्रशासकीय योगदान दिल्याबद्दल पालकमंत्री श्री. नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत