flowers

उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम



        नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात रविवार दि. ०८ डिसेंबर २०२४ रोजी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये ० ते ५ वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ लसीकरण करण्यात येणार असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने पोलिओ लसीकरणाचे सुयोग्य नियोजन केले आहे.

        भारत देश पोलिओमुक्त आहे. परंतू काही देशांमध्ये अद्याप पोलिओ असल्याने तो पुन्हा परत येऊ शकतो यासाठी पल्स पोलिओ मोहीम राबविली जात आहे.

        नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ० ते ५ वर्ष वयोगटामधल्या अपेक्षित ९१२१३ बालकांच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेऊन मोहीमेचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता २५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ६०९ स्थायी, ७५ ट्रांझिट व २७ फिरते मोबाईल असे एकूण ७११ बुथ कार्यरत असणार आहेत. या लसीकरण मोहिमेसाठी मॉल, रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा वर्दळीच्या ठिकाणी ट्रांझिट व फिरती मोबाईल पथके तयार करण्यात आलेली आहेत.

        त्याचप्रमाणे महापालिका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या अध्यक्षेतखाली सिटी टास्क फोर्स समितीची बैठक घेण्यात आली असून नियोजनाचा आढावा घेण्यात आला. तसेच पल्स पोलीओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्याकरिता वैद्यकीय अधिकारी, एनएम, एलएचव्ही, एएनएम, आशा व स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे. या मोहीमेकरीता महापालिका कार्यक्षेत्रात जनजागृतीपर पोस्टर्स व बॅनर्स लावण्यात आले आहेत. पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेच्या दिवशी बूथवरील स्वयंसेवकांनी बाळाला हाताचा स्पर्श होणार नाही याची काळजी घेणे. तसेच डाव्या कंरगळीवर पेनने खूण करताना बाळाचा हात न पकडणे याबाबात प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

        या पोलिओ लसीकरण मोहिमे अंतर्गत ज्या बालकांनी दि. ०८ डिसेंबर २०२४ रोजी डोस घेतला नसेल त्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ८८९ टिमव्दारे गृहभेटीमध्ये पुढील ५ दिवस‍ घरोघरी जाऊन डोस देण्यात येणार आहे. याकरिता प्रत्येक टिमचे कार्यक्षेत्रनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

       तरी पालकांनी पोलिओवर मात करण्यासाठी देशव्यापी मोहिमेत सहभागी व्हावे आणि आपल्या ० ते ५ वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत