महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एन्टरटेन्मेंट आयोजित राज्यस्तरीय “साहित्यवलय पुरस्कार २०२४” चा निकाल जाहीर

 

`साहित्यवलय लक्षवेधी' पुरस्कारार्थींची नावेही जाहीर.  

ठाणे - साहित्य क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या राज्यातील साहित्यिकांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एन्टरटेन्मेंट यांच्या वतीने प्रथमच राज्यस्तरीय 'साहित्यवलय पुरस्कार २०२४' चे आयोजन करण्यात आले. या पुरस्काराचा निकाल आयोजक मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी जाहीर केला आहे. धृपद एन्टरटेनमेंट चे कवी ऋग्वेद आणि पूजा मुळे - देशपांडे यांच्यातर्फे या पुरस्कार सोहळ्याचे सर्व साहित्य रसिकांना निमंत्रण देण्यात येत आहे. 

साहित्यवलय पुरस्कार २०२४ निकाल पुढील प्रमाणे - शब्दसुर जपून ठेव - नेहा लिमये (उत्कृष्ट ललित संग्रह -पुणे), परका - लालासाहेब जाधव (पदार्पण -ठाणे), दौशाड - डॉ. नंदकुमार राऊत (आत्मचरित्र -न्यू पनवेल), दुर्ग निर्माता - हिरोजी अभिजीत केतकर (ऐतिहासिक-पुणे), हिडन मेजरमेंट - गोविंद काळे (कादंबरी-सोलापूर), डोईचा पदर आला खांद्यावरी - डॉ. छाया महाजन (स्त्रीवादी-औरंगाबाद), झुरळ आणि इतर काही बाही - प्रमोदकुमार अणेराव (कथासंग्रह -भंडारा), चिंब सुखाचे तळे - जयश्री अंबासकर (वृत्तबद्ध कविता - नागपूर), दिवसांची पाने - सुनीती लिमये (गजल संग्रह-पुणे), पातीवरल्या बाया - सचिन शिंदे (कवितासंग्रह- यवतमाळ), दाराशुकोह - किमया देशपांडे (अनुवाद- पुणे), सुट्टीतल्या गोष्टी - प्रीती वडनेरकर (बाल साहित्य- नागपूर). 

या प्रमुख पुरस्कारांसह साहित्यवलय लक्षवेधी पुरस्काराच्या 30 पुरस्कारार्थींची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. रूपये १ लाखाहून अधिक रोख रक्कमेचे एकूण ४२ पुरस्कार आणि स्मृतीचिन्ह सुप्रसिद्ध कवी, गीतकार प्रवीण दवणे यांच्या हस्ते २५ ऑक्टोबर रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात एका जाहीर कार्यक्रमात देण्यात येणार आहेत.  त्याचबरोबर कवी ऋग्वेद यांच्या "अर्धा मुर्धा चंद्र" या कवितासंग्रहाचे आणि ती मी आणि ऱ्हीदम या कवितासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन देखील याच सोहळ्यात करण्याचे आयोजिले आहे. 


२७ फेब्रुवारी २०२३ मराठी भाषा गौरव दिवस ते २७ फेब्रुवारी २०२४ मराठी भाषा गौरव दिवस या कालावधीत प्रकाशित झालेले मराठी भाषेतील काव्यसंग्रह, कादंबरी, कथासंग्रह, ललित लेखन, आत्मचरित्र, बालसाहित्य, अनुवादित साहित्य, वृत्तबद्ध काव्य साहित्य, स्त्राrवादी साहित्य, गजल साहित्य, ऐतिहासिक साहित्य, लक्षवेधी साहित्य अशा प्रकारातील एकूण ३०० हून अधिक पुस्तके या पुरस्कारांसाठी स्वीकारण्यात आली. `साहित्यवलय' या पुरस्काराचे स्वरूप ५ हजार ५५५ रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे. तर लक्षवेधी साहित्यासाठी १ हजार रूपये रोख आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजक मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत