नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी ६० दिवसांची मुदत

महापालिकेच्या वेबसाईटवर पूर्ण योजना उपलब्ध


            ठाणे  : ठाणे महानगरपालिकेने ठाणे शहराची पहिली सुधारित विकास योजना प्रकाशित केली असून त्यावरील हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी नागरिकांना ६० दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. ही विकास योजना ठाणे महापालिकेच्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली असून महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद बल्लाळ सभागृहात त्याचे सर्व नकाशे हे नागरिकांना पाहण्यासाठी प्रदर्शित करण्यात आले आहेत.


           ठाणे शहराचा विकास आराखडा १९९९मध्ये मंजूर झाला होता. त्याची मुदत वीस वर्षांची होती. त्यानुसार, महापालिकेने आता पहिली सुधारित विकास योजना प्रकाशित केली आहे. ही योजना अहवालासह नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून त्यावर नागरिकांनी ६० दिवसात सूचना आणि हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.


          या योजनेचे नकाशे व अहवाल कामकाजाच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर, या प्रारुप विकास योजनेचे नकाशे आणि तपशिलाच्या प्रती योग्य शुल्क आकारून ठाणे महापालिकेच्या मुख्यालयातही उपलब्ध आहेत.


          प्रारुप आराखडा शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या ६० दिवसांच्या मुदतीत नागरिकांनी त्यांच्या सूचना आणि हरकती लेखी स्वरुपात प्रशासक तथा आयुक्त, दुसरा मजला, ठाणे महापालिका मुख्य इमारत, पाचपाखाडी, ठाणे -४००६०२ येथे कारणांसह सादर कराव्यात. या सूचना आणि हरकतींचा विचार शासन नियुक्त समितीमार्फत केला जाईल. ही समिती त्या सर्व सूचना कर्ते आणि हरकतीधारकांना सुनावणीसाठी आमंत्रित करेल. त्यानंतर, आवश्यक ते बदल करून हा आराखडा प्रशासक तथा आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येईल. हा सुधारित आराखडा ठाणे महापालिकेच्या महासभेसमोर सादर करण्यात येईल. महासभेकडून त्यात बदल आणि सूचना सुचवल्या जातील. समितीने केलेल्या सूचना, महासभेने केलेले बदल आणि नगर रचना संचालकांनी केलेल्या सूचनांसह हा आराखडा राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, अशी माहिती विकास योजनच्या घटकाचे उपसंचालक कुणाल मुळे यांनी दिली आहे.


       आराखड्यात सुचविण्यात आलेली आरक्षणे

उद्याने - ६२  

बॉटनिकल गार्डन - ०१

खेळाची मैदाने - ६३

क्रीडा संकूल - ०७ 

रिक्रिएशन मैदाने - २४

बहुउद्देशीय मैदाने - ०४

तरण तलाव व जिमखाने - ०१

वॉटरफ्रंट - ०७

तिवरांचे वन - ०४

प्रेक्षागृह - ०१

नाट्यगृह - ०१

कन्व्हेंशन सेंटर - ०१

अर्बन फॉरेस्ट पार्क - ०१

टाऊन पार्क - ०१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत