शांतीनगर शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती

                                        


ठाणे (जिमाका) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४७ - कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप अंतर्गत  आज (१८ ऑक्टोबर) शांतीनगर येथील ठामपा शाळा क्रमांक ३८ येथे मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. या मतदान जनजागृतीस पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून २० नोव्हेंबर रोजी आम्ही मतदान करणार असल्याचा विश्वासही महिला पालक मेळाव्यास उपस्थित असलेल्या पालकांनी दिला. 


यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण करून त्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून देत उपस्थितांना मतदान करण्याचे आवाहन केले 

स्वीपचे सदस्य राजेंद्र परदेशी व अनंत सोनावणे यांनी  लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला असून या अधिकाराचा वापर प्रत्येकांने करुन लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावला पाहिजे असे आवाहन केले. आपण स्वत: मतदान कराच, परंतु आपल्या घरातील सदस्य, शेजारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांना सुद्धा मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा संदेश मतदार जनजागृतीच्या माध्यमातून देण्यात आला. यावेळी मतदान करण्याची शपथ सर्वांना देण्यात आली.

तसेच नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी अर्जाचे वाटप करुन नवमतदारांना सुद्धा मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी स्वीप टिमचे नोडल अधिकारी कमलाकांत म्हेत्रे, स्वीपचे सदस्य  सिताराम परब व  अविनाश सावंत तसेच शाळेतील मुख्याध्यापिका आशा पाटे, व इतर शिक्षक उपस्थित होते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत