अखेर वाल्मिकी समाजाला मिळणार भूखंड

 रामवाडीत वाल्मिकी जयंतीनिमित्त मिरवणूक




ठाणे -  वागळे ईस्टेट येथील रामवाडी - रामनगर येथे महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळेस वाल्मिकी समाजाच्या हजारो नागरिकांनी पीआरपीचे नेते राजाभाऊ चव्हाण आणि दशरथ आठवाल यांच्या नेतृत्वाखाली मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून वाल्मिकी मंदिरासाठी समाजाकडून केल्या जाणाऱ्या जागेच्या मागणीला तत्त्वतः मान्यता देण्यात आल्याची माहिती राजाभाऊ चव्हाण यांनी दिली. 


 रामवाडी - रामनगर येथे असलेल्या एका भूखंडावर गेल्या अनेक वर्षांपासून वाल्मिकी समुदायाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत होते. मात्र, या भूखंडाची मालकी खासगी इसमाची असल्याने त्याने ही जागा आपल्या ताब्यात घेतली होती. यावर वाल्मिकी समाजाने मुख्यमंत्र्यांना साकडे घालून जागा आपणाला द्यावी, अशी विनंती केली होती. त्या मागणीचा विचार करून शासनाने सदर जागा मालकाचे पुनःर्वसन करून या ठिकाणी वाल्मिकी भवन बांधण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या निमित्त वाल्मिकी समाजाने गुरूवारी सायंकाळी रामवाडी - रामनगर येथे राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. 

दरम्यान, महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास  येथे भव्य मिरवणूकही काढण्यात आली. या वेळी परिसरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत