किटकजन्य, जलजन्य व साथरोग प्रतिबंधात्मक आरोग्य जनजागृती शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

 


नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप, डेंग्‍यू, जलजन्‍य व साथरोग आजाराचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागामार्फत आयोजित विशेष शिबिरांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात 3, 5, 12, 20, 28 तसेच 5 सप्टेंबर रोजी 24 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रत्येक दिवशी 24 ठिकाणी तसेच गणेशोत्सवामध्ये 14 ते 16 सप्टेंबर या कालावधीत संध्याकाळी जनजागृतीपर शिबिरे आयोजित करण्यात आली असून या विशेष शिबिरांचा लाभ 1,07,352 नागरिकांनी घेतलेला आहे.

अशाच प्रकारच्या विशेष शिबीरांचे आयोजन 25 सप्टेंबर रोजी 24 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रांमार्फत त्यांच्या क्षेत्रात करण्यात आले होते. या 24 ठिकाणी आयोजित शिबिरांना 10,780 नागरिकांनी भेट दिली. या शिबिरांमध्ये 641 नागरिकांचे रक्तनमुने घेण्यात आले. या नागरिकांना हिवतापडेंग्‍यू, जलजन्‍य व साथरोग आजारांविषयी माहिती देत ते रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी आणि करावयाच्या उपायोजनांबाबत प्रात्यक्षिकांसह  माहिती देण्यात आली.  

                   

        या शिबिरांमध्ये ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात दाखवून तसेच डासांच्या आळ्या प्रत्यक्ष दाखवून नागरिकांना घराभोवती व घरांतर्गत सहजपणे निर्माण होणा-या डासोत्पत्ती स्थानांची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे याला प्रतिबंध करण्यासाठी घरात किंवा बाहेर पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने बंदिस्त करणे, त्याचप्रमाणे पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे व आठवड्यातून एक दिवस ते स्वच्छ करुन कोरडे ठेवणे, भंगार साहित्य व टायर्स इत्यादी नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शीट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू देऊ नये तसेच तापाची लक्षणे दिसू लागताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे याबाबत आवाहन करण्यात आले.

      नमुंमपा आरोग्य विभागामार्फत करण्यात येणा-या कार्यवाहीसोबतच नागरिकांनीही जागरूकतेने आपल्या घरातील व घराभोवतालची डासउत्पत्ती स्थाने वेळीच नष्ट करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपले घर व परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी उकळून पिणे, भाजीपाला स्वच्छ करून व धुवून वापरणे, उघडयावरचे अन्न खाणे टाळणे याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. महानगरपालिका करीत असलेल्या कार्यवाहीसोबतच नवी मुंबईकर नागरिकांनी सहकार्य केल्यास नवी मुंबई शहरात हिवताप - डेंग्यू रुग्णसंख्या व जलजन्‍य / साथरोग आजारावर आळा घालणे शक्य  होईल. तरी नागरिकांनी याबाबत संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत