सामाजिक परिवर्तनात साहित्यिकांची भूमिका महत्वाची! डॉ.संतोष राणे
मुलुंड- " केवळ लेखनात शौर्याची भाषा असून उपयोग नाही,तर प्रत्यक्षात समाजाला जेव्हा - जेव्हा गरज असेल तेव्हा साहित्यिकांनी धावून जाण्याची वृत्ती ठेवायला हवी. मला काय त्याचे ही वृत्ती देशाला अपायकारक आहे. लेखनातून क्रांती घडविण्याची क्षमता लेखकांमध्ये आहे. त्याचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याची गरज आहे. समाजाच्या प्रगतीत सर्व घटकांचे योगदान महत्वाचे ठरते. प्रगतशील समाज सतत प्रगतीची दिशा ठरवीत असतो. यामध्ये सामाजिक परिवर्तन महत्वाचे ठरते. या सामाजिक परिवर्तनात लेखक - कवींची समाज विधायक भूमिका अत्यन्त महत्वाची ठरते. असे साहित्यिकच समाजाला दिशा देऊन एकसंध ठेवू शकतात." असा आशावाद जोशी - बेडेकर महाविद्यालयातील मराठी भाषा विभाग प्रमुख प्रा.डॉ. संतोष राणे यांनी व्यक्त केला. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आत्माराम गोसावी यांच्या ' मी आणि माझी साठवण ' या पुस्तकाच्या ज्ञानराज सभागृहात आयोजित केलेल्या प्रकाशन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लेखक आत्माराम गोसावी, सहलेखिका अनुराधा गोसावी, अरविंद गोसावी आणि महाराष्ट्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.राणे पुढे म्हणाले," केवळ लेखन करून साहित्यिकाला थांबता येणार नाही. या लेखनातील ज्ञानप्रकाश समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याची जबाबदारी उचलता यायला हवी. गेली साठ वर्ष लेखक आत्माराम गोसावी ही जबाबदारी पार पाडत आहेत. अनेक संस्थांचे ते अध्यक्ष असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना साह्य होईल असे निर्णय घेतलेले आहेत. मागेल त्याला मदत , आणि शिकेल त्याला शिक्षण या न्यायाने ते कार्य करीत आहेत. आता ते पंच्चाहत्तर वर्षाचे असले तरी त्यांच्या कार्याचा झपाटा तरुणांनाही लाजविणारा आहे. आत्माराम गोसावी यांच्यासारखे लेखकच सामाजिक परिवर्तन घडविण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडू शकतात. सध्या अश्याच
लेखक - कवींची समाजाला नितांत गरज आहे."
लेखक आत्माराम गोसावी म्हणाले, " मला शालेय शिक्षण घेताना ज्या प्रचंड अडचणी आल्या त्या इतर विद्यार्थ्यांना येऊ नयेत यासाठी गेली अनेक वर्ष मी प्रयत्नशील आहे. विविध संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साह्य करीत आहे. हे कार्य करीत असताना सर्वच माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळेच समाजातील अनेक विद्यार्थी आज उच्च विद्याविभूषित आहेत. या प्रवासात जे अनुभव आले ते शब्दबध व्हावेत यासाठी पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न केला".
यावेळी दिग्दर्शक मनिष पंडित, लेखिका प्रज्ञा पंडित, कौस्तुभ गोसावी इत्यादी अनेक मान्यवरांची भाषणे झाली. अरविंद गोसावी यांनी शैलीदार सूत्रसंचालन केले.

Post a Comment