सर्वधर्मीय मंदिरे व प्रार्थनास्थळांमध्ये सीसीटीव्ही बसवा! पुजारी व सेवेकरींचे पोलीस व्हेरिफिकेशन करा, ठाणे पोलीस आयुक्तांकडे ठाणे जिल्हा भुमीपुत्र संघटनेची मागणी

 



ठाणे,  ः दिव्यातील एका मंदिरात आश्रयाला आलेल्या एका विवाहित महिलेवर पुजारी व सेवेकरींनी अत्याचार करून तिची हत्या करण्याचा प्रकार घडल्यानंतर मंदिरे आणि प्रार्थनास्थळेही आता सुरक्षित नसल्याची भावना व्यक्त करत मंदिर व प्रार्थनास्थळांमध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसवावे तसेच सर्व धार्मिक स्थळांतील व्यक्तीचे पोलीस व्हेरिफिकेशन करून त्यांची नोंद ठेवण्याची मागणी ठाणे जिल्हा भुमीपुत्र संघटनेने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे. ठाणे जिल्हा भुमीपुत्र संघटनेचे निमंत्रक अक्षय कोळी, ठाणे ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले, मेघनाथ घरत यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन देत या घटनेत जबाबदार आरोपींना कडक शासन करून मंदिरांच्या सुरक्षिततेबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली.

वैवाहिक वादातून एक स्त्री घर सोडते, मानसिक तणावा खाली शांतीच्या शोधात मंदिर गाठते, रात्रीच्या वेळी मंदिरात आश्रय घेते, स्वतःला पुजारी म्हणवणारे त्या मानसिक स्थैर्य गमावलेल्या स्त्रीला आधार देण्या ऐवजी तिच्या चहात भांगेच्या गोळ्या मिसळून तिला बेशुद्ध करतात, त्यानंतर तिच्या वर तीन तीन नराधम अतिप्रसंग करतात, तिला शुद्ध आल्यावर जेव्हा ती प्रतिकार करते तेव्हा तिचे डोके दगडावर आदळतात, तिचा गळा दाबून तिची हत्या करतात आणि डोंगरावरून खाली फेकून देतात, किती भयानक आहे. त्यांना जरी देवाची भीती वाटत नसली तरी त्यांना आता कायद्याची भीती जरूर वाटायला हवी, ते पुजारी म्हणून त्यांच्यावर कोणतीही नरमाई कायद्याच्या माध्यमातून त्यांना मिळता कामा नये आणि ह्या नराधमांना फाशी पेक्षा जर कठोर शिक्षा असेल तर ती मिळाली पाहिजे ह्यासाठी समाज म्हणून मागणी करणे आता आपली जबाबदारी आहे, ह्या नराधमांच्या कृत्याचा जाहीर निषेध करून त्यांना फाशी पेक्षा कठोर शिक्षेची मागणी करत आहोत. आणि ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व मंदिर, सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. तसेच मंदिरात सेवा देणारे पुजारी व सेवेकरी यांची माहिती पोलीस ठाण्यात नोंद असायला हवी किंवा त्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यास त्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध होवून वरील घातक प्रवृत्तीला आळा बसू शकेल. तरी आपण याबाबत योग्य ती दखल घेवून कार्यवाही करावी, अशी मागणी ठाणे जिल्हा भूमीपुत्र संघटनेने ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत