विशाळगडावरील कारवाईविरोधात मुंब्र्यात मूक निदर्शने
ठाणे - न्यायालयाचे स्थगन आदेश असतानाही विशाळगडावर ठराविक समुदायाला लक्ष्य करून निष्कासन करावाई करण्यात आली. या कारवाईचा निषेध म्हणून मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी निदर्शकांनी पोलिसांना निवेदनही दिले.
विशाळगडावर उभी करण्यात आलेली दुकाने आणि घरे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता पाडली आहेत. ठराविक समाजाला लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली आहे, ही कारवाई करण्यासाठी धार्मिक द्वेष पसरविणाऱ्या काही संघटनांचा हात असल्याचा आरोप करीत ही निदर्शने करण्यात आली. यावेळी निदर्शकांनी तोंडाला काळ्या फिती बांधल्या होत्या.
या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी सांगितले की, न्यायालयाने निष्कासनाची कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे. जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही. तोपर्यंत कारवाई करू नये, असे स्पष्ट आदेश असतानाही दोन धर्मांमध्ये आलबेल असताना तणाव निर्माण करून राजकारण करण्याचा डाव काही लोकांनी आखला आहे. देशातील सामाजिक शांतता नष्ट करण्यासाठी हे कृत्य केलं जात असून त्याचा निषेध करण्यासाठीच आम्ही मूक निदर्शने केली आहेत, असे सांगितले.
दरम्यान, यावेळेस आंदोलकांनी पोलिसांना निवेदन देऊन सामाजिक अशांतता निर्माण करणार्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली. या आंदोलनात शेकडो शांतताप्रिय नागरिक उपस्थित होते.
Post a Comment