मुंबईचा पाहुणा ठाण्यात आला , पान गळतीने तांबट पक्ष्याचे होऊ लागले दर्शन

 


ठाणे शहर, (राजीव डाके)


वसंत ऋतूची पान गळती सुरू होऊन बोकडी झालेली झाडे हळूहळू कोवळ्या नाजूक पानांनी बहरू लागली आहेत. या बहरणाऱ्या इवल्याशा कोवळ्या पानांमध्ये मुंबईचा पक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तांबट पक्षाचे मोहक रूपडे दिसू लागले आहे. पान गळतीच्या हंगामात हा पक्षी पाहण्यासाठी  पक्षीप्रेमी आवर्जून भटकंती करत असतात. सध्या ठाणे, मुंबई सारख्या शहरांमध्ये पान गळती झालेल्या झाडा झाडांवर हा पक्षी दिसू लागला आहे.


थंडीत अनेक परदेशी पक्षी भारतातील विविध भागात येत असतात. ठाणे, मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरांमध्येही अनेक प्रकारचे पक्षी बघायला मिळत असतात. या पक्षांच्या गर्दीत इवलासा पण मोहक रुपड्याचा तांबड पक्षी मात्र हरवलेला असतो. आकाराने चिमणी पेक्षा काहीसा मोठा असलेला हा पक्षी झाडांच्या पानांचा गर्दीत सहजपणे नजरेत पडत नाही. परंतु पांनाची गळती सुरू होताच तो झाडांवर दिसू लागतो. इंग्रजीत त्याला कॉपर स्मिथ बारबेट असे म्हणतात. निसर्गाने त्याच्यावर विविध रंगांची उधळण केलेली आहे. झा़डावर बसून टूक टूक करणारा त्याचा आवाज लगेच लक्ष वेधून घेतो. लहान आकारामुळे तो सहजरित्या दिसत नाही. परंतु पिंपळ, उंबर वड अशा झाडांवर त्याचे वास्तव्य जास्त असते. त्यामुळे सकाळी - संध्याकाळी हमखास दिसून येतो आहे.  


हिवाळ्याचा मोसम नुकताच संपला आहे. त्यामुळे दुपरच्यावेळेत उन्हाचे चटके जाणवू लागकेन आहेत. त्यातच पानगळतीला सुरुवात झाल्यामुळे झाड देखील उजाड दिसू लागली आहेत. परंतु या उजाड झाडांवर वर्षभर न दिसणारे पक्षी हमखास दिसत आहेत. या दिवसात स्थलांतरित पक्ष्याबरोबर मुंबई, ठाण्यात  "तांबट पक्षी" सर्वाचे लक्ष वेधतो आहे. हा पक्षी सहसा कोणाला दिसत नाही. झा़डावर टूक टूक असा आवाज काढत बसलेला पक्षी पानांच्या आड बसलेला असतो. निसर्गाने या पक्ष्याला  हिरवा, लाल, काळा, पिवळा अशा विविध रंग बहाल केले आहेत, त्यामुळे त्याला बघता क्षणी कोणीही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही असे पक्षीअभ्यासक मंदार बापट यांनी सांगितले.


* तांबट पक्ष्याचे तीन प्रकार असून कॉपर स्मिथ बारबेट, तपकिरी डोक्याचा तांबट (ब्राऊन हेडड बारबेट) आणि पांढऱ्या गालाचा तांबट (व्हाईट चिक बारबेट) असे  प्रकार आढळून येतात. यापैकी कॉपर स्मिथ बारबेट ठाणे, मुंबई शहरात सर्वत्र आढळतो, तपकिरी डोक्याचा तांबट संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि पांढऱ्या गालाचा तांबट पश्चिम घाटात दिसतो. आपल्याकडे दिसणाऱ्या तांबट पक्ष्याला रसाळ फळे खायला भरपूर आवडतात. काहीवेळा लहान किटकांवर देखिल तो ताव मारतो. एरवी गर्द झाडांमध्ये लपून बसलेला असतो, परंतु सध्या पानगळतीचा हंगाम असल्याने हा पक्षी वड, पिंपळ, उंबर, जांभूळ अशा झाडांवर बसलेला दिसतो. 


* ठाण्यातील उपवन तलाव, वसंत विहार परिसरातील झाडी, कोलशेत रोड वरील झाडी, गायमुख परिसरातील झाडे, येऊन अशा विविध भागात तांबट पक्षाची तुक टुक ऐकू येत आहे. त्याचे दर्शन घडतं आहे.


* भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, राज्यपक्षी हरीयल आणि मुंबईचा पक्षी तांबट या पक्ष्यांची वेगळी ओळख आहे. साधारण चिमणीच्या आकाराचा म्हणजे १९ सेमी लांबीचा हा पक्षी आहे  तांब्याच्या हंडीवर हातोड्याच घाव घातल्यावर जसा आवाज येतो; तशाच पद्धतीने हा ओरडतो. त्यामुळे स्थानिक भाषेत याला तांबट असे नाव पडले असावे असे सांगितले जाते. हा पक्षी शक्यतो वड, पिंपळ, उंबर, जांभूळ, अशा स्थानिक झाडांवर रहाणे पसंत करतो. सुकलेल्या फांदीवर चोचीने टोचून बिळ (घरटे) तयार करतो. फेब्रुवारी ते एप्रिल विणीचा हंगाम असतो. नर मादी दोघेही पिल्लांची काळजी घेतात. पिल्ले घरटे सोडून गेली की चिमणी, दयाळ व इतर लहान पक्षी त्या पोकळी मध्ये आपले घरटे तयार करतात.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत