भाडोत्रीवर बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
ठाणे शहर, (बातमीदार)
शेजारी राहणाऱ्या विवाहितेवर बलात्कार करून तिचा धारदार शस्त्राने खून करणाऱ्या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आठ वर्षापूर्वी ठाण्यातील आनंद नगर वसाहतीमध्ये भर दुपारी हा गुन्हा घडला होता.
२ ऑक्टोबर २०१६ रोजी आरोपी बाबू उर्फ समीर गोपाळ गोगावले (गुन्हा करतानाचे वय २० वर्षे) या युवकाने भर दुपारी ३० वर्षीय विवाहितेवर बलात्कार करून धारदार शास्त्राने गळा कापून तिचा फोन केला होता. विवाहित राहत असलेल्या दुमजली घराच्या खालच्या घरात तो राहत होता. दुपारी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत तो वरच्या घरात गेला होता. गुन्हा करत असताना कोणाला तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकायला येऊ नये म्हणून त्याने घरातील टिव्हीचा आवाज वाढवला होता. खून करून तो खालच्या घरात आला आणि घाईघाईत आंघोळ करून रक्ताने भरलेले कपडे लपवून ठेवले. खाली खेळत असलेले विवाहितेचे लहान मुले वर गेले असता त्यांनी आईला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. ते पाहून आई मेली, आई मेली असे ओरडत ते खाली आले असता हा प्रकार उघडकीस आला. आरोपी घाईघाईत कपडे बदलून गर्दीत सामील झाला होता. कोपरी पोलिसांनी त्याच्यावर संशय घेऊन त्याला ताब्यात घेतले असता सत्य बाहेर आले. शनिवारी (ता.३०) या प्रकरणाची अंतिम सुनावणी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए एन शिरसिकर यांच्या समोर झाली असता सरकारी वकील रश्मी क्षीरसागर यांनी १५ साक्षीदार तपासून न्यायालयासमोर भक्कम पुरावे सादर केले. त्या पुराव्याच्या आधारे आरोपी गोगावले याला दोषी ठरवून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
Post a Comment