'यापुढे ठाण्यात एकही बालक मूकबधीर राहणार नाही'

 


  •              खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास
  •              ठाणे महानगरपालिकेच्या 'मूकबधीर बालक मुक्त ठाणे' योजनेचा शुभारंभ
  •              दोन्ही कानांसाठी कॉकलिअर इन्प्लांटच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करणारी ठाणे महापालिका देशात पहिली

          



ठाणे  : ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या 'मूकबधीर बालक मुक्त ठाणे' या उपक्रमात महापालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाचे स्क्रिनिंग केले जाईल. त्यामुळे कर्ण दोष असलेल्या सर्वच नवजात बालकांचे तत्काळ निदान होईल. तसेच, त्यावर जलद उपचार होतील. त्यामुळे लवकरच ठाण्यात एकही बालक मुकबधीर राहणार नाही, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला. ठाणे महानगरपालिकेच्या  'मूकबधीर बालक मुक्त ठाणे' या योजनेचे उद्घाटन आणि आदर्श कार्यपद्धतीचे प्रकाशन शनिवारी सकाळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले.

         
महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे झालेल्या या समारंभास व्यासपीठावर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार अॅड. निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी महापौर मिनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक संजय वाघुले, प्रख्यात ईएनटी तज्ज्ञ डॉ. प्रदीप उप्पल, डॉ. आशिष भूमकर, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे उपस्थित होते. त्याचबरोबर, माजी नगरसेवक, महापालिकेने केलेल्या आर्थिक मदतीमुळे कॉकलिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली मुले, त्यांचे पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्यात, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने, बालकांच्या स्क्रिनिंगसाठी लागणारी चार उपकरणे (ओऐई) महापालिकेच्या चार प्रसूतीगृहांना वितरित करण्यात आली.

        
 'मूकबधीर बालक मुक्त ठाणे' योजनेची तयारी गेले काही महिने सुरू होती. त्याच्या आदर्श कार्यपद्धतीवरही बरीच चर्चा झाली. त्यातून ही योजना आकाराला आली आहे. 'मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या अभियानात हा उपक्रम महानगरपालिकेने हाती घेतला आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन आणि डॉ. प्रदीप उप्पल, डॉ. आशिष भूमकर यांनी खूप मेहनत घेतली असल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. 

         
तसेच, पायाभूत सुविधांच्या दृष्टीने ठाणे बदलू लागले आहे. तसाच विकास आरोग्य क्षेत्राचाही होत आहे. बरेचदा ज्या गोष्टी दिसतात त्या करण्याकडे आमचा भर असतो. न दिसणाऱ्या मात्र आवश्यक असणाऱ्या गोष्टी तज्ज्ञ मंडळी लक्षात आणून देतात. त्यातूनही या अशा योजना आकार घेतात, असेही खासदार शिंदे म्हणाले. दोन्ही कानांसाठी कॉकलिअर इन्प्लांट देणारी ठाणे महापालिका ही देशातील पहिलीच महापालिका आहे, असेही खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

        
 कॉकलिअर इन्प्लांट झालेल्या बालकांच्या, कोमल कुंभार, तेजस साटम, प्रभाकर कदम या पालकांनी आजच्या समारंभात मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी या मशीनच्या अद्यावतीकरणासाठी येणारा खर्च आणि त्याकरता लागणारी मदत यांचा विचार करण्याची विनंती केली होती. तो धागा पकडून डॉ. शिंदे यांनी, अद्यावतीकरणसाठीही महापालिका मदत करेल. त्याचाही आदर्श कार्यपद्धतीत समावेश करण्याची सूचना डॉ. शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केली. कॉकलिअर इन्प्लांट झालेल्या आयुष कदम या मुलांने उपस्थितांशी संवाद साधला. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

         
आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी महापालिकेच्या  'मूकबधीर बालक मुक्त ठाणे' या योजनेला शुभेच्छा दिल्या. तसेच, महापालिकेने हे मोठे आणि महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे प्रतिपादनही केले.

         
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी  'मूकबधीर बालक मुक्त ठाणे' या योजनेची तसेच, त्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या कार्यपद्धतीची माहिती दिली. ठाणे महापालिकेतर्फे आतापर्यंत कर्णदोष असलेल्या बालकांच्या उपचारासाठी रुपये दोन ते अडीच लाखांपर्यंतची मदत केली जात होती, त्याचा फायदा आतापर्यंत अनेक बालकांना झाला आहे. आतापर्यंत सुरू असलेल्या या योजनेचे स्वरूप आमुलाग्र बदलून ही योजना सर्वकष आणि सर्वव्यापी करण्यात आली असल्याचे आयुक्त श्री. बांगर म्हणाले.
              
              
नवीन योजनेत ठाणे महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या किंवा खाजगी प्रसूतिगृहात जन्मलेल्या कोणत्याही बालकात कर्णदोष असेल तर त्याला योजनेचा लाभ घेता येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात जन्माला येणाऱ्या सर्व नवजात बालकांची कर्ण दोषासाठी OAE स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे निदान लवकर होऊन उपचार जलद करणे शक्य होईल. ऑपरेशन झाल्यावर स्पीच थेरपीसाठीही मदत या योजनेत केली जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात एकही बालक मूकबधीर राहू नये, असा संकल्प केलेला असून त्यासाठी महापालिकेसोबत सर्व खाजगी रुग्णालयाचे सहकार्य अपेक्षित आहे, असे आयुक्त श्री. बांगर यांनी सांगितले. तसेच, ही योजना ठाणे महापालिकेने सुरू केली आहे. भविष्यात त्याचा विस्तार ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण राज्यभर होईल, असा विश्वासही श्री. बांगर यांनी व्यक्त केला.

         
याप्रसंगी, डॉ. प्रदीप उप्पल यांनी सुरूवातीच्या काळात झालेल्या शस्त्रकियांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाची माहिती दिली. तसेच, याबद्दल तत्कालीन पालकमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आर्थिक मदतीचाही उल्लेख डॉ. उप्पल यांनी केला. त्यांच्या आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे ही योजना सुरू होत आहे. त्यासाठी महापालिकेनेही पाठबळ दिले, असेही डॉ. उप्पल म्हणाले. ठाणे महापालिकेने आता सर्जिकल लॅब सुरू करावी. त्यात सर्वच सर्जनना प्रयोग करता येतील, अशी सूचनाही केली. 

        
तर, डॉ. आशिष भूमकर यांनी महापालिकेने अशी योजना सुरू करून संवेदनशीलता दाखवली असल्याचे म्हटले. त्याचबरोबर, मुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या शहरातील नागरिकांच्या मनात काय आहे हे नेमकेपणाने जाणतात. त्यातूनच अशा योजना आकाराला येतात, असे प्रतिपादनही त्यांनी केले. या योजनेत खाजगी रुग्णालयांनाही सोबत घेतले हे महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमात, अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी दिलेला या उपक्रमासाठी दिलेला शुभेच्छा संदेश प्रसारित करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी आभार प्रदर्शन केले. तर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत