ठाणे महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्यावतीने सोमवारी त्यांना अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. या कार्यक्रमाचा आरंभ राज्य गीताने करण्यात आला. तसेच, महापालिकेच्या सुरक्षा दलातील आरक्षक योगेश्वर विसपुते यांनी खड्या आवाजात महाराजांची थोरवी सांगणारा पोवाडा सादर केला. या कार्यक्रमास, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
त्यानंतर, मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, उपायुक्त शंकर पाटोळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नागरिकांनी 'जय भवानी, जय शिवाजी'चा निनाद करून महाराजांना मानाचा मुजरा केला. तसेच, कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (मुख्यालय) जी. जी. गोदेपुरे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
ठाणे महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षातही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त (माहिती व जनसंपर्क) उमेश बिरारी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे आणि महापालिकेचे अधिकारी, पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य पत्रकार आदी उपस्थित होते.

Post a Comment