कर परताव्यासाठी समाजसेवा करू नका-अभिनेत्री सुकन्या मोने यांची अपेक्षा
टीडीएस आणि इन्कम टॅक्स भरायला बरं पडेल म्हणुन समाजसेवा करू नका, तर, प्रत्येकाने आपल्या मिळकतीतील थोडे तरी समाजसेवेसाठी देणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा लोकप्रिय मराठी अभिनेत्री सुकन्या मोने - कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत सोमवारी सुकन्या मोने यांची मुलाखत माधुरी ताम्हणे यांनी घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
ठाण्यातील सरस्वती शाळेच्या प्रांगणात गेल्या ९ जाने.पासुन सुरू असलेल्या ३८ व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचा समारोप सोमवारी झाला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष
आ. संजय केळकर यांनी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना, गेली ३८ वर्ष एकाच ठिकाणी सुरू असलेल्या या चळवळीचा आढावा घेतला. ठाणे ही सांस्कृतिक राजधानी आहे. अशा प्रकारची व्याख्याने ही आपली गरज व भूक असुन यामुळे माहितीचे दालन खुले होते. असे सांगितले.तर, आभार प्रदर्शन शरद पुरोहीत यांनी केले.
म्हाळगी व्याख्यानमालेच्या समारोपाचे पुष्प गुंफताना गायिला आरती अंकलीकर-टीकेकर यांच्याऐवजी ऐनवेळी मुलाखतीसाठी बोलावलेल्या अभिनेत्री सुकन्या मोने यांना माधुरी ताम्हणे यांनी विविध विषयांवर बोलते केले. सुकन्या यांनीही मनोरंजन सृष्टीत साकारलेल्या तसेच आयुष्यात धिटाईने सामना केलेले प्रसंग दिलखुलासपणे श्रोत्यांसमोर उलगडले. पाचवीत असल्यापासुन भरतनाट्यम शिकायला सुरुवात केलेल्या सुकन्या यांना नृत्यांगना व्हायचे होते, स्वतःची डान्स अॅकडमी काढायची होती. नाहीतर शिक्षक किंवा बँकेत नोकरी करायची इच्छा होती.परंतु आई - वडील दोघेही कमर्शियल आर्टिस्ट असल्याने घरून पाठीबा मिळाला आणि अभिनय क्षेत्रात रमले. पण कुठल्याही भूमिकेचा अभ्यास आजवर कधीच केला नसल्याचे सांगितले. अभिनय ते संजय मोने यांच्यासोबत झालेल्या विवाहापासुन संसारातील गमतीजमतीही त्यांनी खुमासदार शैलीत सांगितल्या.
आजपर्यंतच्या अभिनयाच्या प्रवासात सुकन्या यांना अनेक लहानमोठे अपघात झाले.झुलवा करताना सातार्याला देवदासीचा संताप अनुभवला. देवदासी डोळे फोडायला आल्या होत्या. २१ - २२ व्या वर्षी स्टेजवर अपघात झाला, पुन्हा फिल्मसिटीमध्ये अख्खा सेट कोसळुन, प्लास्टर ऑफ पॅरिसचा खांब अंगावर पडला होता. अर्धे शरीर अर्धांगिने लुळे पडले होते.पण तरीही त्या सर्व आघातातून आणि आजारातुन कशा सावरल्या ? अन अभिनयासाठी उभ्या राहिल्या, त्याची चित्तरकहाणी श्रोत्यांसमोर मांडताना या सगळ्याचे श्रेय आपल्या आईला दिले. आईमुळेच समाजसेवेची आवड निर्माण झाली. माणसाकडे माणुस म्हणुन पहाण्यास आईने सांगितले. त्यानुसार,घरी येणाऱ्या गरजुंना नेहमी मदतीचा हात पुढे करतो. ज्यांच्यापर्यत कुणी पोहचत नाही, अशा एका कर्करुग्णांच्या संस्थेला, मानसिक रुग्णांचा संभाळ करणाऱ्या संस्थेला आणि गेवराई येथील संस्थेसोबत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.ज्या मुलांचे कुणी नाही त्यांचे पालकत्वही त्यांनी घेतले.या कामात पतीसह कन्येचाही सहभाग असल्याचे नमुद करताना आजुबाजुच्या अनेकजणांची मदत मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. बंगला, मसिडीझची स्वप्ने तर माझीही आहेत परंतु समाजातील बेघरांची घरे झाली तर त्याचा आनंद अधिक असेल. यासाठी गावी आम्ररस महोत्सव राबवुन दरवर्षी चार ते पाच लाखांचा नफा अशा संस्थांना देत असल्याचे सांगुन, टीडीएस किती कट होईल ? इन्कम टॅक्सला किती बरं पडेल ? यापेक्षा आपल्याला जेवढी करता येईल तेवढी मदत करावी. किंबहुना सर्वानीच आपल्या मिळकतीतील १० टक्के तरी समाजसेवेसाठी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
Post a Comment