ठाण्यात पोलीस दादाच्या माणुसकीच्या भिंतीला मिळू लागला प्रतिसाद

 



ठाणे शहर, (बातमीदार)-कायद्याची अंमलबजावणी करताना पोलीस कठोर वाटत असला तरी त्याच्यातही माणुसकी असते. ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशाने सुरू झालेल्या 'पोलीस दादाची माणुसकीची भिंत' या उपक्रमातून नौपाडा पोलिसांचाही असाच माणूसकीचा चेहरा समोर आला आहे. नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये लावलेला हा बॅनर सध्या सर्व नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून लोकांकडून विविध आणणे आणि घेऊन जाण्याला सुरुवात झाली आहे. 


कायदा सुव्यवस्था राखण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. त्यामुळे गुन्हे रोखण्यासाठी त्याला सतत वर्दितला खाक्या दाखवावा लागतो. मात्र अनेकदा त्याच्या या कठोर चेहऱ्यामागील माणुसकीचा चेहरा तसाच लपून राहतो. त्यालाही त्याच्यातली माणुसकी दाखवायची असते. त्याचीही इच्छा ओळखत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी 'पोलीस दादाची माणुसकीचे भिंत' ही संकल्पना राबविण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्या आदेशान्वये नौपाडा पोलीस ठाण्यात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात सुरु करण्यात आलेल्या या ठिकाणी लावलेल्या बॅनर वर 'असेल ते द्या, नसेल ते घेऊन जा', असे लिहिले आहे. तसेच तेथे तीन बास्केट ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पुरुष महिला आणि लहान मुले असे वर्गीकरण करून तुमच्याकडे असलेल्या वस्तू येथे ठेवा आणि तुम्हाला लागणाऱ्या वस्तू घेऊन जा अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. या बास्केटमध्ये घरातील जुने कपडे, भांडी, खेळणी, पुस्तके इत्यादी वस्तू ठाणेकर दान करू शकतात. बास्केट मधील कोणती वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला हवी असल्यास ती त्याला वस्तू घेऊन जाता येणार आहे.

बुधवार (ता.१०) रोजी महिला सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे यांनी या उपक्रमाला भेट देऊन त्याचे कौतुक केले. यावेळी एका ठाणेकराने पुस्तके दान दिली. 


पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने आणि पोलीस उपायुक्त गणेश गावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे यांच्या मार्गदर्शना खाली नौपाडा पोलीस ठाण्यात हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी ठाणेकरांसोबतच पोलीस सुध्दा त्यांना नको असलेल्या वस्तू येथे ठेवणार आहेत. कोण्या गरजूला यातील एखादी वस्ती हवी असल्यास त्याला ती घेऊन जाण्यास सांगितले आहे.


रविंद्र क्षीरसागर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नौपाडा पोलीस ठाणे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत