मनोरुग्णालयात रुग्णांकडून दिला जातोय मानस चहा
ठाणे : ठाणे मनोरुग्णालयात रुग्णांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असताना रुग्णालयातील व्यवसाय उपचार आणि पुनर्वसन विभागा मार्फत आता पूर्ण बरे झालेल्या रुग्णांना व्यवसायिक चहा स्टॉल चालविण्याचे धडे दिले जात आहेत. रुग्णालयात "मानस चहा" ब्रँडचा स्टॉल उघडला आहे. त्यामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आदी सर्वांना या स्टॉल वर चहाचा वेगळा स्वाद मिळणार आहे.
मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यातील कौशल्य जाणून ते विकसित केले जातात. व्यवसाय उपचार पद्धतीने रुग्णांची शारिरीक व बौद्धिक क्षमता वाढीस मोठी मदत मिळते. त्यामुळे वर्षभर रुग्णांना विविध वस्तू तयार करण्याचे शिकवले जाते. जेणेकरून याचा फायदा मनोरुग्णांना भवितव्यासाठी उपयोगी पडू शकेल. हाच धागा पकडून रुग्णांना चहा बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. रुग्णालय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गर्शनाखाली "मानस चहा" ब्रँडचा स्टॉल सुरू करण्यात आला असल्याची माहिती व्यवसायउपचार तज्ज्ञ डॉ.सुधीर पुरी यांनी दिली.
रुग्णालयातील पूर्णतः बरे झालेले रुग्ण हा चहाचा स्टॉल चालवत आहेत. या रुग्णांना रुग्ण मित्र म्हणून ओळखले जात असून, व्यवसायिक चहा बनवण्याचे प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे. रुग्णालयात दररोज रुग्ण, त्यांचे नातेवाईक मित्र मंडळी येत असतात. रुग्णालयात खाण्यापिण्याची सोय नाही. त्यामुळे बरेच वेळा बाहेर जाऊन चहापान करावे लागते. मात्र आता रुग्णालयात मानस चहा मिळणार आहे.
मनोरुग्ण लवकर बरा होऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात कसा येईल यासाठी रुग्णालयाचे प्रयत्न असतात. व्यवसाय उपचार थेरपीने रुग्णाची हात डोळे आणि मेंदू यांची सुसूत्रता, आकलन क्षमता, एकाग्रता, आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते.
डॉ. सुधीर पुरी (व्यवसायउपचारतज्ज्ञ मनोरुग्णालय ठाणे)
रुग्णाची एकाग्रता वाढावी, समाजात सुसंवाद वाढावा स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास योजनेतून विविध व्यवसायिक उपक्रम राबवले जातात.
डॉ. नेताजी मुळीक ( वैद्यकीयअधीक्षक, मनोरुग्णालय [ठाणे ]
Post a Comment