कोपरीत झाडावर केली काळी जादू
अंधश्रद्धेवर घाला घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अमलात आला असला तरी या आघोरी प्रथा कमी होताना दिसत नाहीत. ठाण्यातील कोपरी परिसरात असलेल्या स्वामी समर्थ मठाच्या रस्त्यावर असाच एक अंधश्रद्धेचा प्रकार आढळून आला. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर अज्ञाताने सात ठिकाणी काळ्या रिबीन बांधून अघोरी कृत्य केले आहे. ऐन रस्त्याच्या कडेलाच हा प्रकार असल्याने येथून ये जा करणाऱ्यांच्या मनात भय निर्माण होत आहे.
महाराष्ट्र सरकारने 2013 मध्ये महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी आणि दुष्कर्मी प्रथा काळी जादू अधिनियम संमत केला आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर असे अघोरी प्रकार करणाऱ्यांवर वचक बसला. मात्र गेल्या काही वर्षापासून पुन्हा एकदा अंधश्रद्धेला वाव देणारे जादूटोण्याचे अघोरी प्रकार घडताना दिसू लागले आहेत. ठाण्यातील कोपरी परिसरात असलेल्या स्वामी समर्थ मठाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला बोराच्या झाडावर अज्ञात व्यक्तीने आघोरी कृत्य केल्याचे दिसून येत आहे. या झाडावर सात ठिकाणी काळ्या रंगाच्या रिबीन बांधून तेथे पूजाअर्चा केली गेल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एकांतात असलेल्या या रस्त्यावर सकाळ आणि संध्याकाळ मोठ्या प्रमाणात लोकांची मॉर्निंग वॉक करण्यासाठी गर्दी असते. यामध्ये लहान मुले, शालेय विद्यार्थी, महिलांचाही मोठा समावेश असतो. तसेच हा रस्ता स्वामी समर्थ मठाकडे जाणारा असल्याने मठात जाणाऱ्यांची गर्दीही मोठ्या प्रमाणात दिसून येते. तसेच मठाच्या परिसरात असलेल्या लोकवस्तीत राहणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. या रस्त्यावर दुपारच्या वेळेत शुकशुकाट असला तरी सकाळ आणि संध्याकाळी येथे मोठी वर्दळ असते; त्यामुळे दुपारच्या वेळेत अथवा रात्री उशिरा कोणीतरी हा प्रकार केला असावा असा संशय येथील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
पहाटे पासूनच स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर वर्दळ सुरू होते. सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. मात्र आता या ठिकाणी असे देवस्की, अंधश्रद्धाचे प्रकार घडू लागले आहेत. एका झाडाला काळ्या सात रिबीन बांधलेल्या आहेत. मात्र यामुळे येथून फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरू लागले आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अंध भक्तांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.
- मनोहर चव्हाण, ठाणे पूर्व
नवस, जादूटोणा, भुताटकी अशा प्रकारातून अशा घटना घडत असतात. लोकांना अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. त्यातील काहीजण भोंदूगिरी करणाऱ्या बाबांच्या नादी लागतात. तो बाबा सांगेल तसे करतात. त्यातूनच हा प्रकार घडलेला असावा. अशाप्रकारातून लोकांना तात्पुरता रिलीफ मिळत असला तरी या प्रकाराने त्यांचे पुढील आयुष्य मात्र उध्वस्त होण्याचीच जास्त शक्यता असते. या लोकांच्या कमकुवत मनाचा हे बाबा पैसे उकळण्यासाठी उपयोग करून घेतात. त्यामुळे पुढील आयुष्य दुरुस्त होण्याऐवजी वेळीच लोकांनी जागृत होण्याची गरज आहे.
- वंदना शिंदे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे

Post a Comment